पात्रांची अंधभक्ती; म्हणे, भगवान जगन्नाथ हे मोदींचे भक्त! देशभरातील भाविकांत संताप
पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान विष्णूचे अवतार आहेत, ते कलियुगातील कल्की आहेत, अशा शब्दांत भाजप नेत्यांनी वेळोवेळी मोदींची आरती केली आहे. मात्र आता भाजप नेत्यांनी कहर केला असून भगवान जगन्नाथ हे मोदींचे भक्त आहेत असे देशभरातील भाविकांच्या भावना दुखावणारे विधान ओडिशातील पुरी लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संबित पात्रा यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे ते वादात सापडले असून भगवान जगन्नाथ यांच्या भक्तांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, आपण काय बोलून गेलो याची जाणीव झाल्यानंतर पात्रा यांनी भाविकांची माफी मागितली आणि पश्चात्ताप म्हणून पुढील तीन दिवस कडक उपवास करणार असल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्नही केला.
संबित पात्रा यांच्या रोड शोचे सोमवारी पुरी येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीही रोड शोसाठी पोहोचले होते. त्यावेळी वृत्तवाहीन्यांच्या प्रसारमाध्यमांशी बोलताना पात्रा यांनी मोदींचे गुणगाण करण्याच्या नादात भगवान जगन्नाथ यांच्या देशभरातील भाविकांच्या भावना दुखावणारे विधान केले. सोमवारी ओडिशात लोकसभेच्या पाचव्या आणि विधानसभेच्या 35 जागांवर निवडणूक पार पडली.
लोकसभेच्या पुरी येथील जागेसाठी सहाव्या टप्प्यात म्हणजेच 25 मे रोजी मतदान होणार आहे.
माफी मागणारा व्हिडीओ व्हायरल
चुकीची जाणीव झाल्यानंतर पात्रा यांनी देशभरातील भाविकांची माफी मागणारा व्हिडीओ सोशल मीडियातून प्रसिद्ध केला. मी जगन्नाथजींच्या चरणी मस्तक टेकून माफी मागतो. पश्चात्ताप करून माझी चूक सुधारण्यासाठी मी पुढील तीन दिवस उपवास करेन, असे पात्रा यांनी म्हटले आहे. तर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना उद्देशूनही पात्रा यांनी पोस्ट लिहीली. आज पुरीमध्ये पंतप्रधान मोदींच्या रोड शोनंतर मी अनेक मीडिया चॅनल्सना निवेदन दिले. मोदीजी हे महाप्रभू जगन्नाथांचे भक्त आहेत, असे मी सर्वत्र बोललो. एका क्षणी मी चुकून बोलून गेलो. आपल्या सर्वांची कधी ना कधी जीभ घसरते. त्याला मुद्दा बनवू नका, अशी विनंती पात्रा यांनी केली.
हा ईश्वराचा अपमान- नवीन पटनायक
महाप्रभू श्री जगन्नाथ हे विश्वाचे स्वामी आहेत. महाप्रभूंना कोणत्याही मानवाचा भक्त म्हणणे हा ईश्वराचा अपमान आहे. त्यामुळे जगभरातील करोडो जगन्नाथ भक्त आणि ओडिया लोकांच्या श्रद्धेला मोठा धक्का बसला आहे. भगवान जगन्नाथ हे ओडिया अस्मितेचे सर्वात मोठे प्रतीक आहे. भाजप नेत्याने ओडियाची ओळख दुखावली असून हे राज्यातील जनतेच्या कायम लक्षात राहील, अशा शब्दांत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पात्रा यांच्यावर तोफ डागली आहे.
पात्रा यांच्या विधानानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह अनेक बडय़ा नेत्यांनी संबित पात्रा यांच्या वक्तव्यावर टीका केली. यानंतर त्यांना माफी मागावी लागली.
पापाच्या लंकेचे पतन निश्चित- राहुल गांधी
जेव्हा पंतप्रधान स्वतःला सम्राट मानू लागतात आणि दरबारी त्यांना देव मानू लागतात तेव्हा त्याचा अर्थ स्पष्ट होतो की, पापाच्या लंकेचे पतन जवळ आले आहे. करोडो लोकांच्या श्रद्धेला धक्का लावण्याचा अधिकार भाजपच्या मूठभर लोकांना कुणी दिला? हा अहंकारच त्यांच्या विनाशाला कारणीभूत ठरत आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पात्रा यांच्यासह मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. दरम्यान, सत्तेच्या नशेत असलेल्या भाजपने आमच्या देवांनाही सोडले नाही. 4 जूनला जनताच त्यांचा अहंकार संपवेल, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List