ड्रग्ज बाळगणाऱया महिलेचा जामीन हायकोर्टाने फेटाळला; अन्य एका आरोपीचाही जामीन फेटाळला
ड्रग्ज बाळगणाऱया महिलेला जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. या महिलेच्या पर्समध्ये 50 ग्रॅम एमडी सापडले होते. तिच्यासोबत अन्य एका आरोपीची जामीन याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.
क्रिस्टिना ऊर्फ सिमरन ऊर्फ आयशा असे या महिलेचे नाव आहे. राजकुमार राजहंस असे दुसऱया आरोपीचे नाव आहे. क्रिस्टिनाला 13 नोव्हेंबर 2021 रोजी अटक झाली. त्यानंतर राजकुमारला अटक झाली. या दोघांनी जामिनासाठी याचिका केली होती. न्या. एन. आर. जमादार यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या याचिकेला सरकारी वकील तन्वीर खान यांनी विरोध केला. या दोन्ही आरोपींविरोधात सबळ पुरावे आहेत. त्यांना जामीन मंजूर करू नये, अशी मागणी अॅड. खान यांनी केली, न्यायालयाने ती मान्य केली.
न्यायालयाचे निरीक्षण
न्यायालयाने विशेष अधिकार वापरून आरोपींना जामीन मंजूर करावा असे हे प्रकरण नाही. आरोपींविरोधात प्रथमदर्शनी पुरावे आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
काय आहे प्रकरण
एक महिला ड्रग्जची विक्री करण्यासाठी साकीनाका येथील लकी हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. क्रिस्टिनाच्या हालचाली संशायस्पद दिसल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिची झडती घेण्यात आली. तिच्या पर्समध्ये 50 ग्रॅम एमडी सापडले. राजकुमारच्या घरी ड्रग्ज तयार केले जाते अशी धक्कादायक माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी 14 नोव्हेंबर 2021 रोजी कोल्हापूर येथील राजकुमारच्या घरावर धाड टाकली. दुसऱया दिवशी तेथील सर्व साहित्य जप्त केले.
क्रिस्टिनाचा दावा
माझ्याकडे अवघे 50 ग्रॅम एमडी सापडले. कायद्याला अपेक्षित एवढे ड्रग्ज सापडलेले नाही. माझी झडती चुकीच्या पद्धतीने घेण्यात आली, असा दावा करत क्रिस्टिनाने जामीन मंजूर करण्याची मागणी केली होती.
राजकुमारचा युक्तिवाद
माझ्या घरावर धाड टाकल्यानंतर दुसऱया दिवशी साहित्य जप्त करण्यात आले. नियमानुसार ही जप्ती झालेली नाही. अन्य आरोपींसोबत माझे पैशांचे व्यवहार झालेले नाहीत, असा युक्तिवाद राजकुमारने केला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List