मतदार यादीतून हजारो नावे गायब; डोंबिवलीकर न्यायालयात दाद मागणार
कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात हजारो नागरिकांची नावे मतदार यादीतून अचानक गायब झाल्याने मोठा गोंधळ उडाला. मतदार यादीतून नाव गायब होणे ही बाब गंभीर आहे. त्यामुळे लोकशाहीतील मतदानाचा हक्क अबाधित राहावा यासाठी नावे गायब होण्यास जबाबदार असणाऱ्यावर कारवाई व्हावी यासाठी डोंबिवलीतील जागरूक नागरिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्धार केला आहे.
निवडणूक आयोगाचे अपयश
मतदार यादीतून ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत त्यांच्यासाठी एक गुगल फॉर्म तयार करून त्यांची माहिती मागवली जात आहे. आतापर्यंत काही मतदारांची नावे मिळाली आहेत. फक्त एका डोंबिवली मतदारसंघातून ५० हजार नावे मतदार यादीतून डिलिट झालेली आहेत. निवडणूक आयोगाचे हे अपयश आहे.
कल्याण पश्चिमेकडील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात असलेल्या मतदान केंद्रात याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करून निवडणूक आयोगाचे अक्षरशः वाभाडे काढले. हा प्रकार धक्कादायक असल्याने डोंबिवलीतील जागरूक नागरिक अक्षय फाटक यांनी या प्रकरणात पुढाकार घेतला आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे फाटक म्हणाले.
पालघरमध्ये रात्री साडेदहापर्यंत मतदान
मतदान यंत्रणेतील घोळाचा फटका पालघर लोकसभा मतदारसंघात अनेक केंद्रांवर पहायला मिळाला. निवडणूक विभागाच्या सावळागोंधळामुळे अनेक ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडली होती. यामुळे विक्रमगड,बोईसर, पालघर विधानसभेतील अनेक केंद्रांवर रात्री साडेदहापर्यंत मतदान सुरु होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List