मुंबईत कॉपी प्रकरणे कमी; निकालही कमीच, डिस्टिंक्शनमध्ये 45 हजार 972 विद्यार्थी
इतर विभागीय शिक्षण मंडळांच्या तुलनेत दरवर्षी मुंबई विभागीय शिक्षण मंडळाचा दहावी-बारावीचा निकाल कमी लागत आहे. इतर विभागांच्या तुलनेत मुंबई विभागातून परीक्षा देणाऱया नियमित तसेच 17 नंबरचा अर्ज भरून बाहेरून परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांची अधिकची संख्या, पालघर, रायगड जिह्यांचा ग्रामीण भाग वगळता सर्वाधिक या विभागात असलेल्या शहरी भागांचा समावेश तसेच अतिशय कडक पद्धतीने होणारे पर्यवेक्षण, कॉपी प्रकरणांना घातलेला लगाम यामुळे मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागत असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई विभागातून 3 लाख 19 हजार 910 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 2 लाख 94 हजार 158 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 91.95 टक्के आहे. गेल्या वर्षी बारावीचा निकाल 88.13 टक्के इतका लागला होता. त्यामानाने यंदा मुंबईच्या निकालात 3.82 टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदा मुंबई विभागाचा आर्टस् शाखेचा निकाल सर्वात कमी 83.56 टक्के इतका लागला आहे, तर सर्वाधिक निकाल सायन्स शाखेचा 96.35 टक्के आहे. कॉमर्स शाखेचा निकाल 90.88 टक्के असून व्यवसाय अभ्यासक्रम आणि आयटीआयचा निकाल अनुक्रमे 90.85 आणि 86.10 टक्के लागला आहे.
मुंबई विभागातील जिह्यांचा विचार करता सायन्स शाखेत रायगड विभागाचा निकाल सर्वाधिक 98.74 टक्के, आर्ट्समध्ये मुंबई उपनगरचा निकाल 90.33, कॉमर्स शाखेत रायगड जिह्याचा निकाल 95.22, तर व्यवसाय अभ्यासक्रम आणि आयटीआय शाखेचा ठाणे जिह्याचा निकाल सर्वाधिक अनुक्रमे 93.66 आणि 89.67 टक्के इतका लागला आहे. राज्यात डिस्टिंक्शन मिळालेल्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक 45 हजार 972 विद्यार्थी मुंबई विभागातील आहेत.
मुंबई विभागीय
निकाल (टक्केवारी)
शाखा निकाल
आर्टस् 83.56
सायन्स 96.35
कॉमर्स 90.88
व्यवसाय अभ्यासक्रम 90.85
आयटीआय 86.10
बारावीच्या परीक्षेत यंदा मुंबई विभागात केवळ 27 कॉपी प्रकरणे आढळून आली आहेत. मुंबईचा निकाल कमी लागण्याचे ठोस कारण सांगता येणे अवघड आहे, मात्र इतर विभागीय मंडळांच्या तुलनेत मुंबई विभागातून परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. जास्त विद्यार्थी संख्येमुळेदेखील निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
डॉ.सुभाष बोरसे, सचिव, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List