बारावीतील गुणवंत वाढले! राज्यातील 8,782 विद्यार्थी 90 टक्क्यांच्या पुढे; 4 हजार 6 विद्यार्थी मुंबई विभागातील
यंदा बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. राज्यातील तब्बल 8 हजार 782 विद्यार्थ्यांना 90 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. यातील सर्वाधिक 4 हजार 6 विद्यार्थी हे मुंबई विभागातील आहेत. इतर विभागीय मंडळांच्या तुलनेत मुंबई विभागाचा बारावीचा निकाल कमी लागला असला तरी गुणवंत विद्यार्थ्यांच्या संख्येत मुंबई विभाग अव्वल ठरला आहे. राज्यातील डिस्टिंक्शन मिळविलेल्या एकूण 1 लाख 90 हजार 570 विद्यार्थ्यांपैकी मुंबईतील विद्यार्थ्यांची संख्या ही 45 हजार 972 एवढी आहे.
गेल्या वर्षी बारावीचा निकाल 88.13 टक्के लागला असून यंदा निकाल तब्बल 5.24 टक्क्यांनी वाढला आहे. वाढलेल्या निकालाबरोबरच गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या पण यंदा वाढली आहे. गेल्या वर्षी राज्यातील 7 हजार 696 विद्यार्थ्यांना 90 व त्यापेक्षा जास्त गुण मिळाले होते. या गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या एक हजाराने वाढली आहे. गेल्या वर्षी राज्यातील 1 लाख 31 हजार 561 विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झाले होते. या विद्यार्थ्यांची संख्या ही यंदा 59 हजार 009 ने वाढली आहे. बारावीत गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या यंदा वाढल्याने बारावीनंतरच्या पुढील प्रवेशात यंदा चुरस पाहायला मिळणार आहे. मुंबई विद्यापीठाने अद्याप प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठीची प्रक्रिया जाहीर केलेली नाही. मुंबईतील बहुसंख्य नामांकित कॉलेज बारावीतील गुणांसोबत पदवी प्रवेशासाठी कॉलेज स्तरावरील सीईटी परीक्षा घेतात. त्याआधारे प्रवेश दिला जातो. यंदाच्या वर्षीपासून मुंबई विद्यापीठांतर्गत सीईटी सेल बॅचरल ऑफ कॉम्प्युटर ऑप्लिकेशन (बीसीए), बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए), बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस) आणि बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (बीबीएम) या अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटी परीक्षेद्वारे घेणार आहेत.
राज्यातील गुणवंत विद्यार्थी
90 टक्के व अधिक गुण 8 हजार 782
85 ते 90 टक्के 28 हजार 753
80 ते 85 टक्के 60 हजार 165
75 ते 80 टक्के 94 हजार 854
70 ते 75 टक्के 1 लाख 28 हजार 771
65 ते 70 टक्के 1 लाख 60 हजार 227
60 ते 65 टक्के 2लाख 5 हजार 958
45 ते 60 टक्क्यांपर्यंत 5 लाख 48 हजार 410
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List