कराडमधील दरोडय़ाच्या तयारीतील टोळी जेरबंद
कराड शहर परिसरातील ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱया सराईत टोळीला कराड शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. टोळीतील पाचजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तीन गावटी पिस्टल, चार जिवंत काडतुसे, दोन कोयते यासह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. टोळीतील एकजण फरार झाला असून, त्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहे. बबलू ऊर्फ विजय संजय जावीर (वय 32, रा. शहापूर इचलकरंजी, ता. इचलकरंजी, जि. कोल्हापूर), निकेत वसंत पाटणकर (वय 30 रा. साईबाबा मंदिराजवळ गोडोली सातारा, ता. सातारा, जि. सातारा), सुरज नानासो बुधावले (वय 24, रा. बुधावलेवाडी विसापूर पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा), राहुल अरुण मेनन (वय 24, रा. कुईल कुडम त्रिशूल, केरळ. सध्या रा. सैदापूर आयटीआय कॉलेज जवळ कराड), आकाश आनंदा मंडले (रा. खटाव, पोस्ट वसगडे, ता. पलूस, जिल्हा सांगली) अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.
विद्यानगर परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून रेकॉर्डवरील पाचजण वास्तव्यात आहेत. यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी आणि कराडमधील एकाचा समावेश आहे. कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेला हे पाचजण विद्यानगर परिसरात रूम घेऊन राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी छापा टाकला असता पोलिसांना पाहून सर्वजण सैरभर पळू लागले. पोलिस आणि गुंड यांच्यामध्ये झटापटही झाली. त्यावेळी पाचजण हाती लागले, तर एकजण फरार झाला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांकडून तीन पिस्टल, चार जिवंत काडतुसे, दोन कोयते, चिकट टेप, पाच दोऱया व एक चाकू असा मुद्देमाल जप्त केला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, कराड तालुका ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांनी भेट दिली. घटनेचे गांभिर्य ओळखून पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर तत्काळ कराडमध्ये दाखल झाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List