कागल तहसीलमधील लाचखोर महिला क्लार्कला अटक
भाडेतत्त्वावर घेतलेली जमीन एनए करण्यासाठी गौण खनिज खरेदी-विक्री करणाऱया व्यावसायिकाकडून 60 हजारांची लाच मागून त्यातील 30 हजार रुपये स्वीकारताना कागल तहसीलदार कार्यालयातील महिला अव्वल कारकुनाला आज सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
श्रीमती अश्विनी अतुल कारंडे (वय 46, रा. लक्षदीपनगर, 4 नंबर बंगला, रेल्वे स्टेशनसमोर, न्यू शाहूपुरी) असे अटक केलेल्या महिला कारकुनाचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे गौण खनिज खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. त्यांनी भाडे करारावर कागल तालुक्यात जमीन घेतली आहे. ही जमीन एन.ए. करण्यासाठी त्यांनी तहसील कार्यालय कागल येथे मूळ मालकाच्या वतीने अर्ज केला होता. पण, या कामासाठी तक्रारदाराकडे अश्विनी कारंडे यांनी 60 हजार रुपये लाचेची मागणी केली. तसेच त्यापैकी 30 हजार रुपये घेऊन येण्यास सांगितले.
दरम्यान, मागणी केल्याप्रमाणे अश्विनी कारंडे यांना तक्रारदाराकडून 30 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या लाचप्रकरणी कारंडे यांच्या विरुद्ध कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List