घनकचरा व्यवस्थापनाबाबत महाबळेश्वर पालिका उदासीन! कचरा डेपोवरील शेडचे काम रखडले; सहा महिन्यानंतरही ‘जैसे थे’

घनकचरा व्यवस्थापनाबाबत महाबळेश्वर पालिका उदासीन! कचरा डेपोवरील शेडचे काम रखडले; सहा महिन्यानंतरही ‘जैसे थे’

निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन हा अतिसंवेदनशील विषय ठरतो. मात्र, या विषयाकडे पालिका गांभीर्याने पाहत नसल्याने अनेक समस्या महाबळेश्वरसमोर उभ्या राहिल्या आहेत. कचरा डेपोवर घनकचरा व्यवस्थापनासाठी तीन महिन्यांत शेड बांधण्याचे काम एका ठेकेदारास दिले होते. सहा महिने झाले तरी ते आजही अर्धवट स्थितीत आहे. या कामाचा ठेका पालिका पुन्हा काढणार की, त्याच ठेकेदारास मुदतवाढ देऊन काम पूर्ण करून घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पालिका कामाचा अनुभव नसलेल्या अधिकाऱयांची नेमणूक केल्यामुळे महाबळेश्वरमधील विकासकामे रखडली आहेत. गलथान कारभारामुळे महाराष्ट्रचे नंदनवन समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. यातून बाहेर पडून महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कधी मोकळा श्वास घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महाबळेश्वर शहराची लोकसंख्या कमी असली तरी हंगाम काळात ही संख्या पर्यटकांमुळे वाढते. या वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात कचऱयाचे प्रमाणदेखील वाढते. कचरा विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यासाठी पालिकेने कारवीआळा येथील कचरा डेपोवर स्थायी समितीच्या निर्णयानुसार घनकचरा व्यवस्थापनासाठी ‘एमआरएफ’अंतर्गत शेड बांधण्याचा निर्णय घेतला. सर्व सोपस्कार पूर्ण करून पालिकेने हे काम 2 कोटी 89 लाख 71 हजार रुपयांना व्ही.डी.के. फॅसिलिटी प्रा. लि. पुणे या कंपनीला शेड बांधण्याचा ठेका देण्यात आला. ठेकेदाराकडून रितसर सुरक्षा अनामत रक्कम भरून घेतली, त्यानंतर 28 डिसेंबर 2023 रोजी करार करून काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.

कराराप्रमाणे ठेकेदारास हे काम पूर्ण करण्यासाठी केवळ तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. त्यानंतर कोणत्याही स्थितीत कामाची मुदत वाढविण्यात येणार नाही, अशा अटी करारपत्रात करण्यात आल्या होत्या. प्रत्यक्ष काम सुरू करून पाच महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला तरी शेडच्या पायाचे कामदेखील पूर्ण झाले नाही. आता काहीच दिवसांत पावसाळा सुरू होणार आहे. या चार महिन्यांत येथे काहीच काम होणार नाही. मग या शेडचे काम केव्हा पूर्ण होणार आणि कचऱयावर केव्हा प्रक्रिया होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर कचऱयावर कोणतीच प्रक्रिया होणार नसेल, तर या डेपोवर केवळ कचऱयाचे डोंगरच उभे राहणार, असे दिसते. सध्या कचऱयावर प्रक्रिया होत नसल्याने येथे दोन कचऱयाचे डोंगर उभे राहिले आहेत. आता पुन्हा पुढील काही महिन्यांत येथे कचऱयाच्या डोंगराची संख्या वाढणार हे नक्की.

पालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील हे येथे येण्यापूर्वी सांगली जिह्यातील शिराळा या नगरपंचायतीचा कारभार पाहत होते. तेथे त्यांचा कारभार वादग्रस्त ठरला होता. आता महाबळेश्वर येथे त्यांच्या काळात विकासकामे रखडत असल्यामुळे पाटील यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. दरम्यान, ज्या ठेकेदाराने मुदतीत काम पूर्ण केले नाही. त्या ठेकेदारास पालिका प्रशासक काळय़ा यादीत टाकणार का, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;