रईसी यांच्या मृत्यूमुळे मध्य-पूर्वेत तणाव वाढला; नव्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडीवरून मोठे राजकीय संकट
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री सोमवारी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले. इराणने इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्र डागली होती. त्याचबरोबर हुती बंडखोरांनाही इस्रायलवर हल्ला करण्याप्रकरणी प्रोत्साहन दिले होते. या पार्श्वभूमीवर आता इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा मृत्यू झाल्यामुळे मध्य पुर्वेत तणाव वाढल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर नव्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खोमेनी यांच्यासमोर मोठे राजकीय संकट उभे राहिले आहे.
सरकार नियंत्रणात ठेवू शकेल अशा उपराष्ट्राध्यक्षाची निवड करण्यास खोमेनी यांनी सांगितले होते. परंतु, रईसी आणि परराष्ट्र मंत्री या दोघांच्या मृत्यूमुळे सरकार चालवण्यावरूनही मोठा पेचप्रसंग इराणसमोर उभा राहिला आहे. रईसी यांचे हेलिकॉप्टर कोसळण्यामागे घातपाताचे किंवा वेगळे असे कारण नव्हते. रईसी हे इराणच्या पश्चिम बाघातील अझरबैजान या डोंगराळ भागात सरकारी दौऱयावर होते. यादरम्यान दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर डोंगराळ भागात धडकून कोसळल्याचे इराणने म्हटले आहे. दरम्यान, इराणची राजधानी तेहरानमध्ये सोमवारी दुकाने, व्यवसाय सुरू होते तसेच शाळाही सुरू होत्या. मंगळवारी मात्र, रईसी यांच्या अंतयात्रेसाठी मोठया प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. रईसी यांचे असे अचानक निघून जाणे आमच्यासाठी मोठा शॉक असल्याचे नागरिकांनी सांगितले.
इराणचा हमासला पाठिंबा
इस्रायल आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या युद्धात इराणने नेहमीच हमासला आणि हुजबुल्लाह या दहशतवादी संघटनेला पाठिंबा दर्शवला. गेल्याच महिन्यात इराणने इस्रायलवर शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता.
अंत्ययात्रेसाठी लोटला लाखोंचा जनसागर
हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी, परराष्ट्रमंत्री आणि इतर आठ जणांची अंत्ययात्रा इराणच्या ताब्रिझ शहरातून काढण्यात आली. या यात्रेत लाखोंचा जनसागर रस्त्यावर उतरला. लोकांच्या हातात रईसींचे पह्टो आणि इराणचा ध्वज होता. राष्ट्राध्यक्षांना निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर झाल्याचे वृत्त इराणमधील वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. रईसींच्या निधनानंतर इराणमध्ये 5 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List