मतमोजणीच्या ड्राय डेला हायकोर्टात आव्हान
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला संपूर्ण दिवस जाहीर करण्यात आलेल्या ड्राय डेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. 4 जून 2024 रोजी मतदानाचा निकाल जाहीर होईपर्यंतच दारूबंदी असावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
मेसर्स इंडियन हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशनने अॅड. वीणा थडाणी व अॅड. विशाल थडाणी यांच्यामार्फत दोन स्वतंत्र याचिका केल्या आहेत. या याचिकांवर सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे. या याचिकेत न्यायालय काय आदेश देणार याकडे तळीरामांचे लक्ष लागले आहे.
काय आहे प्रकरण
लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा 20 मे रोजी मुंबईत पार पडला. मतदानाच्या दोन दिवसआधीपासूनच दारूची दुकाने व बार बंद ठेवण्याचा फतवा जिल्हाधिकारी यांनी काढला. त्यानुसार दारूची दुकाने व बार बंद होते. 4 जूनला मतमोजणी आहे. त्या दिवशी संपूर्ण दिवस दारूबंदीचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत. हे आदेश केवळ मतमोजणीपर्यंत असावेत, अशी विनंती जिल्हाधिकारी यांना करण्यात आली. त्यास जिल्हाधिकारी यांनी नकार दिला. पेंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यात बदल करता येणार नाही, असे उत्तर जिल्हाधिकारी यांनी दिले. हा अन्याय आहे. मतदानाचा निकाल जाहीर होईपर्यंतच ड्राय डे असावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List