मला मर्चण्ट नेव्ही मध्ये जायचेय… मला पास करा, बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिकेतून विनवणी
>> दुर्गेश आखाडे
‘मला मर्चण्ट नेव्हीमध्ये जायचे आहे. त्यासाठी 70 टक्के लागतात. कृपया मला पास करावे…’, ‘मला पास करावे ही विनंती… बारावीच्या विद्यार्थ्यांनी चक्क उत्तरपत्रिकेत असे लिहून परीक्षकांमध्ये पास करण्यासाठी विनवणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशाप्रकारे विनंती करणाऱ्या या दोन्ही विद्यार्थ्यांना नापास व्हावे लागले आहे. हा प्रकार कोकण बोर्डामध्ये घडला.
बारावीच्या परीक्षेचा निकाल आज मंगळवारी जाहीर झाला. परीक्षेच्या वेळी होणाऱ्या कॉपीच्या प्रकारांबद्दलही यावेळी चर्चा झाली. दरवर्षीपेक्षा यंदा कोकण बोर्डामध्ये कॉपीचे प्रकार वाढलेले आढळले. कोकण बोर्डात यंदाच्या बारावीच्या परीक्षेला कॉपीची 9 प्रकरणे पकडण्यात आली. विशेष म्हणजे नऊही कॉपी प्रकरणे रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही कॉपीचा प्रकार घडला नाही. मार्च 2023च्या परीक्षेत कॉपीचा एक प्रकार घडला होता. ती कॉपीची घटना रत्नागिरी जिल्ह्यात घडली होती. गतवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉपीची एकही घटना घडली नाही.
यंदाच्या बारावीच्या परीक्षेत कॉपीच्या प्रकाराबरोबरच आणखी एक आगळीवेगळी घटना कोकण बोर्डात घडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत ‘मला मर्चण्ट नेव्हीमध्ये जायचे आहे. त्यासाठी 70 टक्के गुण लागतात. म्हणून कृपया मला पास करा’ अशी विनंती त्याने केली होती. दुसऱ्या एका विद्यार्थ्यानेही ‘कृपया मला पास करावे’ अशी विनंती आपल्या उत्तरपत्रिकेत केलेली आढळली. पास होण्यासाठी विनवणी करणाऱ्या या दोन्ही विद्यार्थ्यांना या सर्व प्रकारामुळे नापास व्हावे लागले आहे.
‘मला मर्चण्ट नेव्हीमध्ये जायचे आहे. 70 टक्के गुण लागतात. म्हणून मला पास करा’ असे एका विद्यार्थ्यांने तर दुसऱ्या विद्यार्थ्याने ‘कृपया मला पास करा ही विनंती’ असे उत्तरपत्रिकेत लिहीले होते. या दोन्ही विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले आहे. त्याचबरोबर चिपळूण तालुक्यात कॉपीचे 6 प्रकार सापडले.
– सुवर्णा सावंत, सचिव, कोकण बोर्ड
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List