आता खरी लढाई सुरू झालीय, जयंत पाटील यांचे पक्षाच्या कार्यकर्त्यांना पत्र

आता खरी लढाई सुरू झालीय, जयंत पाटील यांचे पक्षाच्या कार्यकर्त्यांना पत्र

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी झाले. या टप्प्याबरोबरच महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवार गटात महत्त्वाची लढत झाली. आता मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जयंत पाटील यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना पत्र लिहिले आहे. त्यात ‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’ असे म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या पवार कुटुंबातील दोन सदस्यांमध्ये थेट लढत होती. यावेळी प्रचारादरम्यान दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भाजपसह अजित पवार गटाला जबरदस्त आव्हान दिले होते. महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जयंत पाटील यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहिले आहे. ही लढाई संपलेली नाही. आत्ता खरी लढाई सुरु झाली आहे. 2024 सालच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या सर्वांना संपूर्ण राज्य ढवळून काढून शरद पवार यांच्या विचारांचे सरकार आणायचे आहे, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले आहे.

या पत्रात जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ या पक्षाचे आपण सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी हे आदरणीय पवारसाहेब यांच्या या कुटुंबाचे सदस्यच आहोत. गेले जवळपास एक वर्ष आपण सर्वजण एक फार मोठी लढाई लढत आहोत. ही लढाई आपल्या व्यक्तिगत लाभाची लढाई नसून ही लढाई महाराष्ट्राच्या अस्मिता, विचार आणि मूल्यांची आहे. महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवण्याचा प्रयत्न हा काही आजचा नाही. तो गेली साडेतीनशे वर्ष होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाची बाजी लावली पण दिल्लीचे मांडलिकत्व स्वीकारले नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी तर मृत्यू पत्करला मात्र ते दिल्लीसमोर झुकले नाहीत. आदरणीय पवारसाहेब हे याच महापुरुषांचे वैचारिक वारसदार आहेत, ते दिल्लीसमोर का झुकतील? काही अदृश्य शक्तींनी आपले पक्ष, चिन्ह काढून घेतले आहे, मात्र जे गेले त्याचा शोक करायचा नाही, मोठ्या ताकदीने समोर येणारी लढाई लढायची हाच आपला विचार आहे.

आपण सर्वांनी एकत्र येऊन पाशवी शक्तींच्या विरोधात लढायचे ठरवले आहे. ही लढाई महाराष्ट्रात आणि देशात रोजगाराची निर्मिती व्हावी, शेतकरी सुखी आणि संपन्न व्हावा, शोषितांचे दुःख दूर व्हावे, यासाठीची ही लढाई आहे. 2024 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत आपण सर्व जण मोठ्या ताकदीने ‘टीम शरद पवार’ या भावनेने काम केले. राज्यातील जनतेने प्रचंड असा विश्वास आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वावर दाखवला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालात मतांच्या संख्येच्या रूपात ते आपल्या सर्वांसमोर स्पष्ट होईलच.

मात्र ही लढाई संपलेली नाही. आत्ता खरी लढाई सुरु झालेली आहे. 2024 सालच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या सर्वांना संपूर्ण राज्य ढवळून काढून आदरणीय शरद पवार साहेब यांच्या विचारांचे सरकार आणायचे आहे. जे आपल्याला सोडून गेले, ते गेले. आता आपल्याला संपूर्ण संघटनेची पुनर्बाधणी पूर्ण करून सामान्य घरातील नेतृत्व सत्तेच्या स्थानांवर नेऊन बसवायचे आहे.लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील आपण सर्वांनी केलेल्या अथक परिश्रमाबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. चला, नव्या लढाईसाठी सज्ज होऊन शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवूया, असे आवाहनही पत्राच्या शेवटी जयंत पाटील यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;