दोन निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या पुणे अपघाताची न्यायिक चौकशी व्हावी, विजय वडेट्टीवार यांची मागणी
मद्यपान करून बेदरकारपणे पोर्शे कार चालवून तरुणीसह दोघांना चिरडणाऱ्या आरोपीच्या बापाला संभाजीनगर येथून अटक केली आहे. पुण्यात झालेल्या भीषण अपघातात पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे या प्रकरणी न्यायिक चौकशी व्हावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हंटलं आहे की,पुणे अपघातातील आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. अल्पवयीन असलेला आरोपी दारू पित असल्याचे सीसीटिव्ही फुटेज असूनही हा अहवाल आल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अल्पवयीन आरोपीला दारू कशी उपलब्ध झाली?रजिस्ट्रेशन नसलेली गाडी पुण्यातील रस्त्यावर कशी आली?नियम डावलून बार आणि पब सुरू होते का? होते तर त्यांच्यावर कारवाई का नाही?या प्रश्नांचा तपास न करता आरोपीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जणू पुणे पोलिसांचा तपास असल्याचे चित्र आहे.
वडेट्टीवार यांनी आरोपी अल्पवयीन आहे हे माहीत असताना त्याच्या वडिलांना अटक करण्यात इतका वेळ का लागला? असा प्रश्न उपस्थित करत सदर घटनेची न्यायिक चौकशी व्हावी आणि या प्रकरणात पुणे पोलिसांची सुद्धा चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
बिल्डर विशाल अगरवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांतने शनिवारी मध्यरात्री 3च्या सुमारास मित्रांसाबेत हॉटलेमध्ये मद्यपान पार्टी केल्यानंतर अलिशान पोर्शे कारने दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यामुळे दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरूणीचा 10 ते 15 फूट उंच उडून खाली पडल्यामुळे जागीच मृत्यू झाला. तर, कारने फरफटत नेल्यामुळे दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी अल्पवयीन आरोपीला मारहाण करीत जाब विचारला. दरम्यान, मोटार चालविण्याचे प्रशिक्षण आणि वाहन परवाना नसतानाही अल्पवयीनाने श्रीमंतीच्या जोरावर मस्तवालपणे वाहन चालवून तरुणीसह दोघांना चिरडल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List