ठाणे महापालिकेचा उफराटा कारभार; बेकायदा बांधकामांवर 41 कोटी खर्च; वसुली फक्त सात कोटींची
ठाणे महापालिकेचा उफराटा कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. आधीच महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असताना बेकायदा बांधकामे प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहेत. त्यातच बेकायदा बांधकामांवरील कारवाईसाठी 41 कोटींचा खर्च पालिका प्रशासनाने केला आहे. तर या अनधिकृत बांधकामविरोधी मोहिमेतून अवघे 7 कोटी 80 लाख रुपये वसुली झाली आहे. दरम्यान कारवाईच्या उत्पन्नामधून मिळणाऱ्या पैशांपेक्षा चार पट जास्त खर्च होत असल्याने पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक हिरा पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे.
ठाणे महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामांचा प्रश्न नेहमीच चर्चेचा विषय बनतो. अनधिकृत बांधकामांवरील कारवाईसाठी पालिका प्रशासनाला करोडो रुपये खर्च करावे लागत आहेत. हा पैसा सर्वसामान्य नागरिकांच्या कररुपी उत्पन्नामधून आलेल्या पैशांतून होत असल्याने उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असे चित्र अर्थसंकल्पामध्ये दिसत आहे. अनधिकृत बांधकामांबाबतची बरीच प्रकरणे उच्च न्यायालयात निकाली काढली आहेत तर उर्वरित प्रकरणे सुरू आहेत. काही प्रकरणांमध्ये निकाल लागूनही कारवाई होत नसल्याचा आक्षेप हिरा पाटील यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नोंदवला आहे. ठाणे महापालिकेचे सन 2024-25 च्या अंदाजपत्रकात अतिक्रमण विभागाकडून जी वसुली केली जाते त्यातून 7 कोटी 80 लाख रुपये उत्पन्न स्वरूपात जमा दाखवले आहे. तर अशी बांधकामे तोडण्यासाठी 40 कोटी 89 लाख खर्च दर्शवला आहे. म्हणजेच शहर अधिकृत करण्यासाठी पालिका 33 कोटी 09 लाख रुपये जनतेच्या पैशांतून खर्च करत असल्याकडे हिरा पाटील यांनी लक्ष वेधले आहे.
लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे कारवाईला सुरुवात करण्यात यावी. पालिकेच्या ९ प्रभागांमध्ये होत असलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात अनेकवेळा आवाज उठवला जात आहे. दरम्यान पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रशासनाने कारवाईचा जोर वाढवावा.
– सचिन पाटील, दिवा शहरप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List