उद्धव ठाकरे यांचा संताप; जिथे शिवसेनेचे मतदान तिथे मुद्दाम दिरंगाई!

उद्धव ठाकरे यांचा संताप; जिथे शिवसेनेचे मतदान तिथे मुद्दाम दिरंगाई!

निवडणूक आयोग भाजपची चाकरी करतोय आयोगाच्या कर्मचाऱ्यांना न्यायालयात खेचणार

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज मतदानासाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला, मात्र शिवसेनेला ज्या वस्त्यांमध्ये जास्त मतदान मिळतेय तेथील मतदान प्रक्रियेत मुद्दाम दिरंगाई केली गेली, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदी सरकारने आयोगाच्या माध्यमातून हा नीच, घाणेरडा खेळ खेळला असून त्यात सहभागी असलेल्या निवडणूक कर्मचाऱयांना कोर्टात खेचू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. तसेच पहाट झाली तरी चालेल, पण मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय मतदान केंद्रातून हटू नका असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.

शिवसेना भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना या प्रकाराची माहिती दिली. मुंबई आणि कल्याणमधील मतदारसंघांमध्ये अशी दिरंगाई झाल्याच्या तक्रारी असल्याचे त्यांनी सांगितले. मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाच्या तथाकथित प्रतिनिधींकडून जाणूनबुजून दोन-तीनदा मतदारांची नावे तपासून वेळ काढला गेला. त्यामुळे मतदान केंद्रावर वेळीच पोहोचूनही मतदारांना रांगेत ताटकळत राहावे लागले. मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी तसेच मतदारांना बसण्याची व्यवस्थाही नव्हती. ज्येष्ठ नागरिक आणि महिला मतदारांना त्याचा खूप मनस्ताप झाला. शिवसेनेचा जोर असलेल्या वस्त्यांमधून अशा तक्रारी आपल्याकडे आल्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मलबार हिलमध्ये मतदान व्यवस्थित चालू आहे, पण शिवसेनेचा जोर आहे तिथे विलंब केला जातोय असे सांगतानाच, निवडणूक आयोग मोदी सरकारची चाकरी करतोय का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. पहाट झाली तरी चालेल, मतदान केल्याशिवाय केंद्रातून बाहेर पडू नका.

मोदी सरकार पराभवाच्या भीतीने आयोगाचा वापर घरगडय़ासारखा करतेय. आयोगाकडून मतदान प्रक्रियेत जाणुनबुजून दफ्तर दिरंगाई होतेय. मतदानाला कुणी उतरू नये म्हणून मोदी सरकारचा हा डाव आहे. मतदान पूर्ण झाल्याशिवाय केंद्र बंद करता येणार नाही. त्यामुळे पहाट झाली तरी चालेल, मतदान केल्याशिवाय केंद्रातून बाहेर पडू नका असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी मतदारांना केले.

मतदान केंद्रांना भेटी देऊन वाढवला मतदारांचा उत्साह
उद्धव ठाकरे यांनी दुपारनंतर माहीम मच्छीमार नगर, धारावी, वरळी, शिवडी भागांतील मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदारांचा उत्साह वाढवला. मतदान करून केंद्राबाहेर आलेल्या मतदारांशी तसेच स्थानिक शिवसैनिकांशीही त्यांनी संवाद साधला.

उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर अनेक मतदार पुन्हा केंद्रांवर परतले
दिरंगाई होत असलेल्या मतदान केंद्रांचे नाव आणि तेथील निवडणूक प्रतिनिधींची नावे तातडीने जवळच्या शिवसेना शाखेला कळवा, जेणेकरून ती जाहीर करता येतील आणि त्यांच्याविरुद्ध न्यायालयात जाता येईल, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत केले. उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर अनेक मतदारांनी अशा मतदान केंद्रांवर जाऊन तेथील निवडणूक प्रतिनिधींची माहिती घेतली. या पत्रकार परिषदेत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते-खासदार संजय राऊत उपस्थित होते.

पैसा घेऊन कुणी आपले आयुष्य विकायला तयार नाही
मतदान केल्यानंतर उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलले. सगळे मतदार जुमलेबाजीला त्रासलेले आहेत. देशातली लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी आणि आपला मतदानाचा अधिकार यापुढेसुद्धा अबाधित राहावा म्हणून यावेळी मोठय़ा प्रमाणात घराबाहेर पडून नागरिक मतदान करत आहेत, असे नमूद करतानाच जुमलेबाजांचा पैशांचा पाऊस आता लोक स्वीकारणार नाहीत. पैसा घेऊन कुणी आपले आयुष्य विकायला तयार नाही, असे परखड भाष्य उद्धव ठाकरे यांनी केले.

मतदारांचा घामटा काढला, तासन्तास रांगेत लटकवले
सगळं संशयास्पद! मुंबईत मतदान कासवगतीने!!
मराठी भाषिक सर्वाधिक मतदार असलेल्या मुंबईतील निवडणुकांच्या तारखा नेमक्या उन्हाळी सुट्टीत ठेवण्याच्या कारस्थानासह भरउन्हात मतदारांना ताटकळत ठेवणे, ओळखपत्राच्या पुराव्यासाठी करण्यात येणारी रखडपट्टी, कधी मोबाईल तर कधी घडय़ाळ बांधून जाण्यासह केलेला विरोध, कधी वोटिंग मशीनच बंद तर कधी लाइट गुल आणि मतदानासाठी ‘मतदार राजा’ला तासन्तास रखडवल्याने आज शेवटच्या टप्प्यात झालेले मतदान प्रचंड संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. मुंबईत तर जाणीवपूर्वक कासवगतीने मतदान घडवून आणल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

मुंबईत आज लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडला. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मात्र अनेक केंद्रांवर मतदान तब्बल अर्धा तास उशिराने सुरू झाल्याने मतदारांमध्ये संताप निर्माण झाला. उशिरा मतदान सुरू झाल्यानंतर निवडणूक कर्मचाऱ्यांनी वेगाने काम करणे गरजेचे असताना मतदारांना जाणीवपूर्वक रखडवले गेले. त्यामुळे कडाक्याच्या उन्हात ताटकळत उभे रहावे लागले. यामध्ये वृद्ध, महिलांसह दिव्यांग, आजारांनी त्रस्त असलेल्या मतदारांना प्रचंड मनस्ताप झाला. विशेष म्हणजे याबाबत विचारणा करणाऱ्या मतदारांसोबत कर्मचाऱ्यांनी वाद घातल्याने अनेक मतदार मतदान न करताच निघून गेले.

‘ईव्हीएम’ बंद, कधी लाईट गायब
पवई येथे तब्बल एक तास ईव्हीएम बंद पडल्याने मतदार ताटकळले. मानखुर्द शिवाजीनगर येथे दीड तास, मुलुंडमध्ये तासभर तर जोगेश्वरी पश्चिम येथे ईव्हीएम बंद पडल्याने मतदारांना मनस्ताप झाला. भांडूप खिंडीपाडा येथे लाइट गेल्याने मतदारांचा खोळंबा झाला.

वर्षानुवर्षे मतदान करूनही नाव गायब
मुंबईत वर्षानुवर्षे वास्तव्य आणि प्रत्येक वेळी मतदान करीत असताना यावेळच्या निवडणुकीसाठी गेले असताना अनेक कुटुंबातील ज्येष्ठाचेच नाव गायब असल्याने त्यांना मतदानाला मुकावे लागले. तर काहींना मतदान ओळखपत्रावरील फोटो मॅच झाला नसल्याने काहींना मतदानापासून रोखण्यात आले. मोबाईलच्या ‘डिजीलॉकर’मधील ओळखपत्र किंवा मोबाईलकरील ओळखपत्राचा फोटो ग्राह्य धरण्यात आला नसल्याने अनेकांना मतदान न करताच माघारी परतावे लागले.

मतदानाची टक्केवारी
मतदारसंघ              2019         2024
उत्तर मुंबई              60.09        55.21
उत्तर-पश्चिम मुंबई      54.37        53..67
उत्तर-पूर्व मुंबई         57.23        53.75
उत्तर-मध्य मुंबई       53.68         51.42
दक्षिण-मध्य मुंबई      55.04        51.81
दक्षिण मुंबई            51.59        47.70

उन्हाळी सुट्टीचाही मतदानावर परिणाम
उन्हाळी सुट्टीत निवडणूक घेण्याच्या निर्णयाचा विपरीत परिणाम सोमवारी दिसून आला. मराठीबहुल भागातील मतदान केंद्रांवर मतदानाचा टक्का कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. लालबाग-परळ, जोगेश्वरी, विक्रोळी, भांडुप, मालाड अशा भागांत मराठी मतदारांची संख्या अधिक आहे. विशेषतः कोकणी माणसांचे प्रमाण इथे जास्त आहे. परंतु, उन्हाळी सुट्टीमुळे मोठय़ा प्रमाणावर मराठी कुटुंबे मूळ गावी गेली आहेत. त्याचा परिणाम मतदानावर दिसला.

आधार कार्डच्या नियमाने गोंधळ
रांगेत उभे राहून उकाडय़ाने मतदार हैराण झाले असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी ओळखपत्राबाबत अचानक नवी टूम आणल्याने अनेक मतदार चिडले. तुमच्याकडे मतदार ओळखपत्र असलं तरी दुसरा पुरावा म्हणून आधारकार्ड हवंच, असा आग्रह एका महिला अधिकाऱ्याने प्रतीक्षानगरमधील मतदान केंद्रावर धरला. तुमचे मतदार ओळखपत्र आणि आमच्याकडील रेकॉर्ड जुळले नाही तर दुसरे ओळखपत्र हवेच असे स्पष्टीकरणही त्यांनी त्यावर दिले. त्यामुळे ज्यांनी आधारकार्ड आणले नव्हते त्यांना रांग सोडून परत घरी जावे लागले.

माटुंग्यात उशिराने मतदान सुरू
माटुंगा (प.) स्टेशनसमोरील कस्तुरबा महिला मंडळातील मतदान केंद्रात मतदान सुमारे 28 मिनिटे विलबांने सुरू झाल्याचा आरोप आशीष जानी यांनी केला. 7 वाजता आलो पण ईव्हिएम मशिन सकाळी 7 वाजून 28 मिनिटांनी सुरु झाल्याचे ते म्हणाले.

तब्बल चार तास रांगेत!
शीक-कोळीवाड्यातील प्रतीक्षानगरमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील शाळेतील बूथ क्र. 18 वर सर्वाधिक गोंधळ होता. सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी रांगेत उभ्या राहिलेल्या अनेक मतदारांचा दुपारी दीड वाजता नंबर आला. यात अनेक मतदारांना उकाडय़ाचा त्रास झाला. एका महिलेला भोवळ आली. अनेक मतदार वैतागून घरी परतले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;