भाजपच्या आदेशावरून केजरीवाल यांना जिवे मारण्याची धमकी
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना दिल्ली सोडा, असे सांगत जिवे मारण्याची धमकी मिळाल्याचा आरोप आपच्या नेत्यांनी केला आहे. आपने एक्स हँडलवर मेट्रो स्टेशनवर लिहिण्यात आलेल्या धमकीच्या संदेशाचे पह्टो प्रसिद्ध केले आहेत. केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा डाव भाजपने आखल्याचा आरोप आपचे नेते खासदार संजय सिंह यांनी केला आहे. राजीव चौक, पटेल नगर या मेट्रो स्थानकांवर भाजपच्या आदेशावरून या धमक्या देण्यात आल्याचा दावा आपने केला आहे. तसेच केजरीवाल यांना जर काही झाले तर त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष जबाबदार असेल असा इशाराही आपने दिला आहे.
केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्यापासून सातत्याने त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न होत आहे. केजरीवाल यांच्या जिवाला धोका निर्माण होईल असे कृत्य भाजपकडून केले जाऊ शकते असा आरोपही संजय सिंह यांनी केला आहे. पंतप्रधान कार्यालय आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इशाऱयावरूनच या धमक्या दिल्या जात आहेत, असा माझा थेट आरोप आहे असेही संजय सिंह म्हणाले.
केजरीवालांच्या 14 दिवसांच्या कोठडीसाठी ईडीचा अर्ज
कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने न्यायालयात अर्ज दाखल करत केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्याची मागणी केली आहे. ईडीने केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना दिलासा देत 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता.
सीसीटीव्ही असताना संदेश कसा लिहिला– अतिशी
सीसीटीव्ही, पोलीस आणि सीआयएसएफचे सुरक्षा कर्मचारी 24 तास इथे तैनात असतात. तरीही स्थानकावर धमकीचा संदेश लिहिला. त्याला शोधण्याचा प्रयत्नही केला जात नाही. स्वाती मालिवाल यांच्या खोटय़ा आरोपांची दखल घेताना पोलिसांनी चपळता दाखवली होती. मात्र हेच पोलीस धमकी देणाऱयाला पकडताना दिसत नाहीत, असा आरोप दिल्लीच्या मंत्री अतिशी यांनी केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List