ज्युवेनाईल बोर्डाची जामिनासाठी अजब अट; रस्ते अपघातावर तीनशे शब्दांचा निबंध लिहावा
वाहतुकीच्या नियमांचा अभ्यास करून 300 शब्दांचा निबंध लिहावा, अशी अट घालून ज्युवेनाईल जस्टीस बोर्डाने अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला. या अल्पवयीन आरोपीने पोर्शे कारने धडक देऊन दोन दुचाकीस्वारांचा बळी घेतला आहे. हा अल्पवयीन आरोपी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे.
वाहतूक विभागात जाऊन अल्पवयीन आरोपीने रस्ते वाहतुकीच्या सर्व नियमांचा नीट अभ्यास करावा. त्यानंतर रस्ते अपघात व त्याचे परिणाम या विषयावर निबंध लिहावा, या अटीवर बोर्डाने साडेसात हजारांचा जामीन मंजूर केला. हा जामीन मंजूर करताना बोर्डाने पालकांनाही काही अटी घातल्या आहेत. पुन्हा तुमचा मुलगा असा अपघात करणार नाही याची काळजी घ्या, असे बोर्डाने पालकांना बजावले आहे.
जामिनाच्या अटी
– अल्पवयीन आरोपीने वाहतूक विभागात जाऊन नियमांचा अभ्यास करावा. पुढील 15 दिवसांत या नियमांचे सादरीकरण बोर्डासमोर करावे.
– नशामुक्ती पेंद्रात अल्पवयीन आरोपीचे समुपदेशन करावे.
– मुलगा वाईट मित्रांसोबत राहणार नाही याची काळजी पालकांनी घ्यावी.
संतापजनक घटना
अल्पवयीन आरोपीने पोर्शे कारने अनिश अवधिया व अश्विनी कोस्टा यांच्या बाईकला जोराने धडक दिली. आरोपी अति वेगाने कार चालवत होता. कारची धडक इतकी भयानक होती की अश्विनी उंच हवेत फेकली गेली. जमिनीवर आपटून तिचा जागीच मृत्यू झाला. अनिसच्या बरगडय़ांना जबर मार लागला. त्याचेही निधन झाले. पुण्यातील कल्याणी नगर परिसरात ही घटना घडली.
आजोबांनी घेतली हमी
मी माझ्या नातवाची हमी घेतो. तो त्याच्या अभ्यासावर लक्ष पेंद्रित करेल. वाईट मित्रांपासून दूर राहिल, असे आश्वासन अल्पवयीन आरोपीच्या आजोबांनी बोर्डासमोर दिले. अल्पवयीन आरोपी फरार होणार नाही. पुराव्यांशी छेडछाड करणार नाही, अशी ग्वाही त्याचे वकील प्रशांत पाटील यांनी बोर्डाला दिली.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
अल्पवयीन आरोपीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेची बोर्डासमोर सुनावणी न होता रितसर फौजदारी खटला चालवला जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार पोलीस पुरावे गोळा करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्या पबमध्ये आरोपीला दारू दिली गेली त्यांच्याविरोधातही पोलिसांनी गुन्हा नोंदवल्याची माहिती आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List