उत्तर पूर्वमध्ये मतदारांचा उत्साह, पण मतदान संथ

उत्तर पूर्वमध्ये मतदारांचा उत्साह, पण मतदान संथ

उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात मतदारांमध्ये मोठय़ा प्रमाणामध्ये उत्साह दिसून आला पण अनेक मतदान केंद्रांवर संथ गतीने मतदान सुरू होते. मानखुर्दमध्ये निवडणूक कर्मचाऱयांचीही कमतरता होती. मुस्लिमबहुल भाग असल्याने या ठिकाणी जाणूनबुजून उशीर केला जात असल्याचा आणि गैरसोयी निर्माण केल्या जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला. दीड ते दोन तास ताटकळत रांगेत उभे राहावे लागत होते. रांग वाढत होती, पण पुढेच सरकत नव्हती असे चित्र मतदारसंघातील बहुतांश केंद्रांवर दिसत होते. उत्तर पूर्वमध्ये सरासरी 53.75 टक्के मतदान झाले. मागील वेळेपेक्षा 4 टक्क्यांनी मतदानात येथे घट झाली.

मानखुर्दमध्ये कडक उन्हात मतदार उभे होते. मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी उपलब्ध नव्हते. कित्येक तास कडक उन्हात उभे राहिल्यामुळे आणि अंगातून घामाच्या धारा वाहत असल्यामुळे मतदारांचे प्रचंड हाल झाले. निवडणूक अधिकाऱयांकडे तक्रारी गेल्यानंतर तात्पुरते शेड उभारण्यात आले.

अनेक मतदारांची नावेच मतदार यादीतून डिलिट

मुलुंड, भांडुप येथील मतदार केंद्रांवर अनेक मतदारांना घरी जावे लागले. मतदार यादीत नाव नसल्याचे कारण विचारले असता नव्याने 17 क्रमांकाचा अर्ज करावा लागेल. मात्र, मतदार यादीत लगेच नाव समाविष्ट करण्यात येणार नाही, वेळ लागेल असे सांगण्यात आल्याचे मतदार गजानन वसंत पवार यांनी सांगितले. विशेष म्हणजे, त्यांच्या आई आणि वडिलांचे नाव मतदार यादीत होते, मात्र, त्यांचेच नाव गायब होते. असा अनुभव अनेकांना आला. ढिसाळ प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे यावेळी मत वाया गेले, अशा शब्दांत गजानन पवार यांनी संताप व्यक्त केला.

 आधी मतदान मग घरकाम

चार घरची धुणीभांडी करणाऱया बायकांनीही मतदानाचा हक्क बजावला. यात आजीबाईंचाही सक्रिय सहभाग होता. अशाच घरकाम करणाऱया सुलोचना गंगाराम नवघरे (70) भेटल्या. मतदानासाठी सकाळी लवकरच त्या घराबाहेर पडल्या. त्यांना याबाबत विचारले असता, सकाळी लवकर घराबाहेर पडले. मतदान केले आणि बाजारात जाऊन भाजीही खरेदी केल्याचे त्या म्हणाल्या. कामाला सुट्टी नाही. त्यामुळे आता कामावर जाणार असे त्यांनी सांगितले.

मुलुंडमध्ये रामाच्या नावाने मते मागण्याचा प्रकार

मुलुंडमध्ये पैशांचे वाटप तसेच अनेक नवनवीन क्लृप्त्या वापरून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे उघड झाले. या विभागात जागोजागी रामाची मोठमोठाली पोस्टर्स लावण्यात आली आहेत. तसेच 500 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अशी जाहिरातही करण्यात आल्याचे दिसून आले. हा आचारसंहितेचा भंग नाही का, असा सवाल नागरिकांनी केला आहे.

 अर्धा ते पाऊण तास ईव्हीएम मशीनचा गोंधळ

मुलुंड, भांडुप, घाटकोपर, मानखुर्द येथील मतदान केंद्रांवर अर्धा ते पाऊण तास ईव्हीएम मशीनचा गोंधळ पाहायला मिळाला. मशीन बंद पडल्यामुळे मतदारांना ताटकळत रांगेत उभे राहावे लागले. अनेक मतदारांनी निवडणूक आयोगाच्या ढिसाळ नियोजनाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. मुलुंडमध्ये आर.आर. एज्युकेशन आणि मिठागर या मतदान केंद्रांवर मतदारांची प्रचंड गैरसोय झाल्याचे मतदारांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;