मोदी यांनी फक्त 22 जणांना अब्जाधीश केले,आम्ही देशातील जनतेला करोडपती बनवणार; राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान सोमवारी होत आहे. आता मतदानाचे दोन टप्पे शिल्लक आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची रविवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सभा झाली. या सभेत राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी भाजपवर हल्ला चढवला. पंतप्रधान मोदी यांनी फक्त 22 जणांनाच अब्जाधीश केले आहे. मात्र, आम्ही देशातील कोट्यवधी जनतेला करोडपती करणार आहोत, असे राहुल गांधी यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात भाजप फक्त एकच जागा जिंकेल, असा टोलाही राहुल यांनी भाजपला लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त 22 जणांना अब्जाधीश बनवले, पण आम्ही देशातील करोडो लोकांना करोडपती बनवणार आहोत. गरीब कुटुंबातील महिलेच्या खात्यात दरवर्षी 1 लाख रुपये जमा करू. शेतकऱ्यांना हमीभाव देत त्यांची कर्जे माफ केली जातील. प्रत्येक शिक्षित तरुणाला नोकरी दिली जाईल. मनरेगा अंतर्गत मजुरांचे वेतन 250 वरुन 400 रुपये करू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी या सभेत दिले. आता भाजपची मनमानी चालणार नाही. वाराणसीचा विकास झाला किंवा नाही, याचा फैसला वारणसीतील जनताच करणार आहे. या वेळी मन की बात चालणार नाही. या निवडणुकीत तुमचा- आमची आपल्या सर्वांची देशातील 140 कोटी लोकांची संविधानाची बात चालणार आहे, असे सांगत अखिलेश यादव भाजपवर निशाणा साधला.
इंडिया आघाडीचे सरकार आल्यास अग्निवीर योजना रद्द करण्यात येणार आहे. तसेच लष्करात जवानांना कायमस्वरुपी नोकऱ्या देऊ, असे आश्वासनही राहूल गांधी यांनी दिले. आम्ही गरीब आणि बेरोजगार लोकांच्या खात्यात पैसे जमा करू, असेही त्यांनी सांगितले. ही संविधान वाचवण्याची ही लढाई आहे. भाजपकडून सातत्याने संविधान बदलण्याची वक्तव्ये करण्यात येत आहेत. मात्र, कोणतीही शक्ती राज्यघटना नष्ट करू शकत नाही. भाजप आणि नरेंद्र मोदींनी फक्त उद्योगपती मित्रांसाठी काम केले, पण आमचे सरकार आले तर आम्ही गरिबांसाठी काम करू, असेही राहुल गांधी म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List