महाबळेश्वरमध्ये आलेल्या पर्यटकांना असुविधांचा फटका, वेण्णालेक ते महाडनाका दरम्यानच्या फुटपाथची दुरवस्था
उन्हाळी हंगामात सहलीसाठी आलेल्या पर्यटकांनी महाबळेश्वर गजबजून गेले आहे. मात्र, येथे आलेल्या पर्यटकांना अनेक असुविधांचा फटका बसताना दिसत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पाचगणी ते कुंभरोशी हा रस्ता चकाचक करून आपली कामगिरी चोख बजावली आहे. मात्र, वेण्णालेक ते महाडनाका या दरम्यान पादचाऱयांसाठी असलेल्या फुटपाथकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने पादचाऱ्यांना चालणे मुश्कील झाले आहे
महाबळेश्वर पालिकेचे प्रशासक म्हणून आलेले मुख्याधिकारी हे यापूर्वी शिराळा या नगरपंचायतीचा कारभार पाहत होते. मोठय़ा पालिकेचा अथवा पर्यटनस्थळावर काम करण्याचा अनुभव नसल्याने पालिकेच्या कारभारात सावळा गोंधळ दिसत आहे. निर्णय घेताना लोकप्रतिनिधींची मुख्याधिकाऱयांना मदत मिळत होती. सध्या प्रशासकीय राजवट सुरू असल्याने नवख्या मुख्याधिकाऱयांना निर्णय घेताना पालिकेशी संबंध नसलेल्यांची मदत घ्यावी लागत आहे. अशी मदत घेऊनही पालिकेच्या गलथान कारभारात काहीच सुधारणा होताना दिसत नसल्याने विकासकामे रखडत असल्याचे दिसत आहे.
वेण्णालेक ते महाडनाका या दरम्यान पर्यटनस्थळावर पादचाऱयांसाठी पालिकेने एका बाजूला फुटपाथ तयार केला आहे. या फुटपाथवरून वेण्णालेक किंवा मुंबई पॉईंटला चालत जाता येते. या फुटपाथची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या फुटपाथवरून चालणे मुश्कील झाले आहे. रस्ते चांगले, परंतु फुटपाथची दुरवस्था झाल्याने अनेक पर्यटक हे रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीत जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालत जात आहेत. पालिकेने दुरवस्था झालेल्या फुटपाथकडे लक्ष द्यावे व तातडीने ते दुरुस्त करून घ्यावे, अशी मागणी पर्यटक व स्थानिक नागरिक करीत आहेत.
पालिका पर्यटकांकडून प्रवेशकर गोळा करते, या करापासून पालिकेला दरवर्षी साधारण चार कोटी रुपयांचा निधी मिळतो. पर्यटकांना प्राथमिक सुविधा पुरविण्यासाठी या निधीचा वापर केला पाहिजे. मात्र, तसे होताना दिसत नाही. पालिकेच्या अशा भोंगळ कारभाराबाबत शहरातून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List