अफगाणिस्तानात पावसाचा हाहाकार, मदतीसाठी सैन्य तैनात; दिवसभरात 60 तर दोन आठवड्यात 370 जण दगावले
अफगाणिस्तानात दोन आठवड्यांपासून पावसाने हाहाकार माजवला असून, मदतीसाठी सैन्याला पाचारण करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे दिवसभरात 60 जणांचा मृत्यू झाला असून, दोन आठवड्यात 370 जण दगावले आहेत. तालिबानी अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. या परिस्थितीचे गांभीर्य पाहून तालिबान सरकारने हवाई दलाला पाचारण केले असून, मदतीसाठी सैन्य तैनात केले. या पंधरा दिवसांत 2 हजार लोक जखमी झाले असून, तब्बल सहा हजार घरे वाहून गेली आहेत.
तालिबानचे प्रवक्ते मौलवी अब्दुल यांनी सांगितले की, पावसाच्या हाहाकारात शेकडो नागरिक बेपत्ता आहेत. खराब हवामानामुळे बचाव पथकाला मदतकार्यात खूप अडचणी येत आहेत. बदख्शान, घोर, बागलान आणि हेरातसह अफगाणिस्तानमध्ये सर्वांत जास्त नुकसान झाले. वर्ल्ड फूड प्रोग्रॉमने (डब्ल्यूएफपी) अहवाल दिला की, अचानक आलेल्या पुरामुळे अफगाणिस्तान पूर्णपणे कोलमडून पडला आहे. एकट्या बागलानमध्ये 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तेथे अजूनही 100 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे हजारो घरे, हजारो हेक्टर शेतजमीन आणि शेकडो जनावरे वाहून गेली आहेत. इंटरनॅशनल रेस्क्यू कमिटीच्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तानच्या बहुतांश राज्यांमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक पथके मदतकार्यात गुंतलेली असून, यूएन डेव्हलपमेंट प्रोग्रामनुसार मदत सामग्री पोहोचवण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधला आहे. आतापर्यंत 300 हून अधिक तात्पुरती घरे बांधली आहेत. तज्ज्ञांनी पावसाचे कारण हवामानातील बदल असल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तानच्या हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, धोका अद्याप टळलेला नाही. 20 मे रोजीही मुसळधार पावसाची शक्यता असून, हवामान खात्याने 16 शहरांना अलर्ट मोडवर राहण्यास सांगितले आहे. पुरामुळे घोर येथील 800 वर्षे जुना जाम मिनार जमीनदोस्त झाला आहे. हा जगातील दुसरा सर्वात उंच मिनार आहे.
मदतीसाठी तालिबान सरकारची आंतरराष्ट्रीय संघटनाकडे मागणी
अफगाणिस्तानात यापूर्वी आर्थिक टंचाईमुळे महागाई वाढली असतांना अवकाळी पावसाने अडचणीत वाढ केली आहे. आर्थिक टंचाई आणि आता नैसर्गिक संकटामुळे अफगाणिस्तान पूर्णपणे कोलमडून पडला असताना परिस्थिती बिकट झाली आहे. यादरम्यान तालिबान सरकारने आंतरराष्ट्रीय संघटनेकडे मदत मागितली आहे. मदत न मिळाल्यास हजारो लोक उपासमारीने मरतील, असे सरकारचे म्हणणे आहे. यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था, राष्ट्रे मदतीसाठी धावून गेले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List