शेतकऱ्यांच्या शेतमालाला 4 जूननंतर किमान आधारभूत किंमत मिळेल; राहूल गांधी यांचे आश्वासन
देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. पाचव्या टप्प्यासाठी शनिवारी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. तर सोमवारी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. रायबरेलीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना मोठे आणि महत्त्वाचे आश्वासन दिले आहे. रायबरेलीमध्ये झालेल्या सभेत राहुल गांधी म्हणाले की, 4 जूननंतर शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत हमीभाव मिळेल. इंडिया आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला देईल, असे त्यांनी सांगितले.
इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर 4 जूननंतर शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्यात येईल. तसेच मनरेगा पुन्हा चांगल्या पद्धतीने सुरू करु. तुम्हाला मनरेगासाठी 250 रुपयांएवजी 400 रुपये देण्यात येतील, असे आश्वासनही राहुल गांधी यांनी दिले. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने त्यांच्या मित्रांची आणि उद्योगपतींची कोट्यवधींची कर्जे माफ केली. मात्र, इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही शेतकऱ्यांची कर्जे माफ करुन दाखवू, असेही गांधी म्हणाले. उत्तर प्रदेशमध्ये शेतमालाला योग्य दर मिळत नाही. शेतकऱ्यांच्या तांदळाला, ऊसाला, बटाट्याला योग्य भाव मिळत नाही. शेतकऱ्यांच्या कष्टाची योग्य किंमत होत नसल्याचे राहुल गांधी म्हणाले. त्यामुळं 4 जूननंतर सर्व शेतकऱ्यांना योग्य तो हमीभाव मिळेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
रायबरेलीसारखाच विकास अमेठीमध्ये देखीली होईल. जे तिथं होईल ते अमेठीत देखील होणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले. मी रायबरेलीचा खासदार होणार आणि अमेठीचाही खासदार होणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले. 10 रुपये रायबरेलीला विकासासाठी जातील, तर 10 रुपये अमेठीत विकासासाठी येतील असेही गांधी म्हणाले. रस्ते, महामार्ग, पायाभूत सुविधा, पूल जे काही रायबरेलीत येईल ते सर्व अमेठीत देखील येईल असे गांधी म्हणाले.
मी मोदींकडून काहीही वदवून घेऊ शकतो- राहुल गांधींचा टोला
राहुल गांधी यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काहीही वदवून घेऊ शकतो, असे सांगत मोदींना टोला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काहीही बोलून घेण्याची ताकद माझ्यात आहे. मी म्हणालो की, नरेंद्र मोदी कधीही अंबानी आणि अदानी यांचे नाव घेत नाहीत. दोन दिवसांनी त्यांनी अदानी, अंबानी यांची नावे घेतली. मी म्हणालो, आम्ही बँक खात्यात पैसे जमा करू, खट-खट. नरेंद्र मोदींनी त्यानंतर आपल्या भाषणात तोच उल्लेख केला ‘खटा-खट’ त्यामुळे आपण मोदींकडून वदवून घेऊ शकतो. मला सांगा तुम्हाला नरेंद्र मोदींकडून काय ऐकायचं आहे? मी ते दोन मिनिटांत पूर्ण करेन आणि जर तुम्हाला मोदींनी काहीच बोलू नये असंही वाटत असेल, तर मी तेदेखील पूर्ण करेन, असेही राहुल गांधी म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List