भाजपचा जाहीरनामा हा ‘खाओवादी’ आहे; उद्धव ठाकरे कडाडले; फडणवीस यांचाही घेतला समाचार
पंतप्रधान नरेंद्र मोदी काल शीवतीर्थावर येऊन गेले. ते सध्या भरकटलेले असून त्यांच्या मेंदुला शीण आलेला आहे. वाटेल ते भ्रमिष्टासारखे बोलत असून कधी मला नकली संतान, नकली शिवसेना म्हणतात, तर कधी काँग्रेसच्या जाहीरनाम्याला मुसलमानांचा जाहीरनामा म्हणतात. काल त्यांनी कहर केला आणि हा माओवादी जाहीरनामा असल्याचे म्हटले. पण निवडणूक रोख्यातील खाल्ल्याला पैसा पाहता भाजपचा जाहीरनामा खाओवादी आहे, असा जबरदस्त घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विक्रोळी येथील जाहीर सभेत केला.
मुंबईला भाजप लुटत आहे. पण सरकार आल्यानंतर पहिल्याप्रथम मुंबई आणि महाराष्ट्रातील लुटारुंना तडीपार केल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली होती, पण सुरतेचे दोघे छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत. हे बघुनही न बघितल्यासारखे करणारे जे सुपारीबाज लोकं आहेत ते मुसलमानांची भीती दाखवत आहेत. आमच्यासोबत मुसलमान येतात म्हणून तुमच्या पोटात का दुखते? तुम्ही ज्यांना बरोबर घेतले त्यांच्यामुळे उत्तर भारतीय आणि जैन यांचे काय होणार? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला.
कल्याणमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली होती. तरीही त्यांना वाचवू शकले नाहीत. शेवटी त्यांना उद्वेगाने पोलीस स्थानकात गोळीबार करावा लागला आणि ज्यांच्याबद्दल तक्रार होती त्यांना मोदी मांडीवर घेऊन फिरत आहेत. मिंध्यांकडे राज्य राहिले तर महाराष्ट्रात गुंडाराज येईल म्हणणारा भाजपचा आमदार तुरुंगात आणि मिंधे यांच्याबरोबर फिरताहेत, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. तसेच घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना बरोबर घेऊन, घटनाबाह्य सरकार सोबत पंतप्रधान फिरताहेत असे लाजिरवाणे चित्र संपूर्ण जगात कुठे नसेल, पण ते महाराष्ट्राला पहावे लागत आहे, असेही उद्धव ठाकरे सुनावले.
ते पुढे म्हणाले की, मर्द शिवसैनिकांच्या ताकदीमुळे त्यांना उद्धव ठाकरेची भीती वाटते. उद्धव ठाकरेला संपवण्यासाठी आता फक्त रणगाडे, रॉकेट आणि अणुबॉम्ब आणायला राहिला आहे. मोदी आधी म्हणायचे ‘में अकेला सब पे भारी…’ पण आता म्हणतात ‘मे अकेला बेचारा…’, मला संपवण्यासाठी विरोधक एकत्र आले. मोदीजी तुम्ही सर्वशक्तीमान, विश्वगुरू असतानाही तुम्हाला उद्धव ठाकरेची भीती का वाटते? असा बोचरा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
…तर फडणवीसही देशद्रोही
काल फडणवीस म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी हिंदू शब्द सोडला. पण मी हिंदुत्व सोडलेले नाही, तर भाजपला सोडले, लाथ मारली आहे. शिवसेनाप्रमुखांचे ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनी आणि मातांनो’, हे वाक्य सोडलेले नाही. पण देशाची लढाई म्हटल्यावर मी ‘जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनी…’ म्हटले, तर आम्ही देशभक्त नाहीत का? देशभक्त शब्दावर आक्षेप असेल तर ते फडणवीस असले तरी देशद्रोही आहेत. आधी या देशद्रोह्यांना गेट आऊट सांगायला पाहिजे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि फडणवीस यांची पिसे काढली.
आज २८- मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील इंडिया-महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.श्री. संजय दिना पाटील ह्यांच्या प्रचारार्थ भांडुप गाव ते कॅम्पस हॉटेल पर्यंत काढण्यात आलेल्या प्रचार फेरीस पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे उपस्थित राहिले.
मशालीचं बटण दाबून, जनहित… pic.twitter.com/Pw1XHcda9R— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) May 18, 2024
महाराष्ट्र अफगाणिस्तानात आहे का?
महाराष्ट्राचे सगळे उद्योग गुजरातला घेऊन जात आहेत. आपण प्रश्न विचारला तर फडणवीस म्हणतात गुजरात पाकिस्तानात आहे का? गुजरात आपलाच आहे. आपल्या देशाचे अविभाज्य राज्य आहे. इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही गुजरातवर अन्याय करणार नाही. पण तुम्ही महाराष्ट्राचे ओरडून तिकडे का नेत आहेत? गुजरात पाकिस्तानात आहे का विचारता, मग छत्रपती, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र अफगाणिस्तानात आहे का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
मस्ती खपवून घेणार नाही
विक्रोळीमध्ये मतांसाठी पैशांचा पाऊस पाडणाऱ्या भाजपचा पर्दाफाश बहाद्दर शिवसैनिकांनी केला. मात्र पोलिसांनी त्यावर कारवाई करण्याऐवजी शिवसैनिक, महिला शिवसैनिकांना पकडून बेदम मारहाण केली. याचाही उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. पोलिसांना एकच सांगतो तुम्ही भाजप किंवा फडणवीस यांचे नोकर नाहीत, जनतेचे सेवक आहात. लोकशाहीआणि जनतेसमोर तुमची मस्ती खपवून घेणार नाही. आमच्याशी मस्तीत वागला तर मस्ती कशी जिरवायची हे मर्द शिवसैनिकांना माहिती आहे. सरकार आल्यावर तुमचे काय करायचे तो निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना दिला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List