जे आमच्या देशभक्त शब्दाला आक्षेप घेतात, तेच देशद्राही आहेत; उद्धव ठाकरे यांचा घणाघात
महाविकास आघाडीची पत्रकार परिषद मुंबई येथे झाली. या पत्रकार परिषदेत इंडिया आघाडीकडून विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 46 जागा मिळतील, असा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला. तर महाविकास आघाडी राज्यात सर्वच्या सर्व 48 जागांवर विजय मिळवेल, असा ठाम विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. देशासमोर अनेक गंभीर समस्या आहेत. मात्र, भाजप जनतेचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडत त्यांचा खरा चेहरी उघडा पाडला. तसेच आपल्या देशातील जुमलापर्व 4 जून रोजी संपणार आहे. प्रचाराचे मुद्दे म्हणजे जनतेच्या जीवनमरणाचे प्रश्न देशभरात चर्चीले गेले आहे. अनेक मुद्द्यांचा उल्लेख मल्लिकर्जुन खरगे आणि शरद पवार यांनी केला आहे. देशात सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. महाराष्ट्र, मुंबईला बदनाम करण्याचे कुटील कारस्थान होत आहे. मुंबई लुटून गुजरातला नेण्याचा डाव आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर महाराष्ट्राचे वैभव आम्ही परत आणू, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
बेकायदा सरकार आणि अंसवैधानिक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान स्वतःच्या हुकूमशाहीचा प्रचार करत आहेत. जो देईल साथ, त्याचा करू घात हीच भाजपची नीती आहे. देशातील सर्व पक्ष संपवून भाजपच हा एकच पक्ष असेल, असे जे.पी. नड्डा म्हणाले होते. आता त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही गरज राहिली नाही. ज्या संस्थेने त्यांना जन्म दिला. त्याच संस्थेची आता त्यांना गरज राहिलेली नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
गद्दारांना मिळालेले खोके आता फुटले आहेत. त्यातून आता नोटा बाहेर निघत आहे. त्याचे वाटप होत आहे. याबाबतच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या आहेत. तसेच काहीजणांकडून मतदानानंतर लावण्यात येणारी शाई लावण्यात येते, म्हणजे ते मतदान करू शकणार नाही. असे प्रकार सुरू आहेत. असे प्रकार आढळल्यास त्या निवडणूक आयोगाच्या निर्दशनास आणून द्या, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.
भाजपच्या मनात अजूनही पाकिस्तान आहे. जे मनी वसे, ते स्वप्नी दिसे, असे मोदींचे आहे. नवाज शरीफ यांच्या केकची चव अजूनही त्यांच्या जिभेवर रेंगाळत असावी, त्यामुळे त्यांना पाकिस्तानची आठवण येते. सत्यापाल मलिक यांनी दिलेली माहिती गंभीर आहे. त्यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने पुलवामा हल्ला घडवला होता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांच्याकडे 10 वर्षे सत्ता होती. या काळात पाकव्याप्त कशमीर त्यांना घेता आलेला नाही. आता चीनही देशात घुसत आहे. त्यावर त्यांना काहीही करता येत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी ते असे मुद्दे उचलत आहेत.आता भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही नकली स्वयंसेवक संघ म्हणतील, तसेच ते आता संघावरही बंदी घालतील. त्यामुळे आता संघालाही भाजपकडून धोका असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
महायुतीमध्ये काहीजण आहेत, त्यांनी आधी स्वतःची दिशा ठरवावी. त्यांची दिशाच ठरलेली नाही. ते भरकटलेले नेते आहेत. मुस्लिम मते मिळवण्यासाठी ते काहीही वक्तव्ये करत आहेत. इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर त्यावर बुलडोझर फिरेल, असे ते सांगत आहेत. मात्र, इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर त्यांनी अर्धवट केलेले काम आम्ही पूर्ण करणार आहोत. जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी त्यांचे केविलवाणे प्रयत्न सुरू आहेत. जे लोक देशभक्त शब्दांवर आक्षेप घेतात, ते हिंदू किंवा देशभक्त नाहीत का, असा सवालही त्यांनी केला. सर्व हिंदू हे देशभक्त आहे. देशभक्त हा सर्वांना सामावून घेणारा शब्द आहे. देशभक्तमध्ये देशातील सर्व जातीधर्माचे नागरिक आहेत. जे देशभक्त शब्दाला आक्षेप घेतात, ते देशद्राही आहेत, असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला.
इंडिया आघाडी ही देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकवण्यासाठी आहे. आमच्याकडे पंतप्रधानपदाचे अनेक चेहरे आहेत. मात्र, भाजपकडे एक चेहरा सोडला तर काहीच नाही. आता त्यांचा चेहराही चालत नाही. आज मोदी लाट कोठेही नाही. आता ते चेहराही बदलू शकत नाही. त्यामुळे भाजपचा पराभव निश्चित आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
निवडणुकीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा हा मुद्दाच नाही – शरद पवार
आता देशसमोर अनेक गंभीर समस्या आहेत. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दाच नाही. भाजपकडून मुद्दाम हा मुद्दा उचलला जात आहे. राहुल गांधी यांनी त्यावर कोणतेही वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे पंतप्रधान असे बिनबुडाचे मुद्दे उपस्थित करत आहेत. त्यामुळे त्यांनी देशातील अनेक गंभीर समस्यांवर वक्तव्य करावे. मात्र, त्यांनी या समस्यांवर वक्तव्य केलेले नाही, असे शरद पवार म्हणाले.
भाजपचे फोडाफोडीचे राजकारण हीच लोकशाही आहे काय? मल्लिकार्जुन खरगे यांचा हल्लाबोल
आमचा जाहीरनामा आधी त्यांनी मुस्लीमधार्जिणा वाटत होता. आता त्यांना आमचा जाहीरनामा माओवादी वाटत आहे. मोदी खोटारडे आहेत, याचे अनेक पुरावे आहेत. आता ते मुस्लिम मुद्द्यावरून माओवादाकडे आले आहेत. ते एकाही मुद्द्यावर स्पष्ट नाहीत. त्यामुळे आता या सरकारचा अंत निश्चित आहे. जनतेला फसवत ते जास्त काळ राज्य करू शकत नाही, असेही खरगे यांनी स्पष्ट केले. मोदी काय बोलतात, त्यांच्या प्रत्येक प्रश्न किंवा आरोपांना आपण उत्तर देत नाही. जे आमच्या जाहीरनाम्यात आहे, त्याचीच आम्ही अंमलबजावणी करणार आहोत, मोदी जे बोलतात, त्याला उत्तर देण्याची गरज नाही, असे खरगे म्हणाले.
महाराष्ट्रात बेकायदा पद्धतीने महायुतीचे सरकार बनवण्यात आले. तसेच या असंवैधानिक सरकारला पंतप्रधान पाठिंबा देतात. तसेच पंतप्रधान त्यांच्या भआषात द्वेष पसरवत आहे. याआधी कोणत्याही पंतप्रधानांनी अशा प्रकारची द्वेषपूर्ण वक्तव्ये केलेली नाही. भाजपने जनतेशी विश्वासघात केला आहे. धमकी, दबावतंत्र आणि प्रलोभने दाखवत इतर पक्ष फोडण्यात आले. तसेच मूळ पक्ष इतरांना देण्यात आला. सर्व सरकारी यंत्रणा मोदींच्या इशाऱ्यावर चालतात. मात्र, आता निवडणुकीत तसेच होणार नाही. आता जनताच या लढ्यात उतरली आहे. त्यामुळे आता जनतेचा विजय होणार आहे, असा विश्वासही खरगे यांनी व्यक्त केला.
मुंबईसह अनेक ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत, हेच मोदी यांची लोकशाही आहे काय, असा सवालही खरगे यांनी केला. त्यांनी इतर राज्यातही फोडाफोडीचे राजकारण करण्यात आले. त्याविरोधात इंडिया आघाडी लढत आहे. महाराष्ट्रातही महाविकास आघाडी मजबूत आहे. त्यामुळे राज्यात 48 पैकी 46 जागा महाविकास आघाडीला मिळतील, असा विश्वासही खरगे यांनी व्यक्त केला. काँग्रेसने जाहीरनाम्यात शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी अनेक आश्वासने दिली आहेत. आर्थिक राजधानी असलेल्या शहराकडेही मोदी यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या काळात महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे. त्यांनी दिलेले कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर जीएसटीसारखा जाचक कर बदलून ही प्रणाली सरळ आणि सुटटुसटीत करण्यात येणार आहे. सरकारी यंत्रणांचा मोदी सरकारकडून गैरवापर होत आहे. इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर हे सर्व थांबवणार आहोत. मोदी दरवेळी विरोधकांवर आरोप करत विरोधकांना देशद्रोही ठरवत स्वतः देशप्रेमी असल्याचे ढोंग करत आहेत, असा हल्लाबोलही खरगे यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List