नरेश म्हस्केंची पायरी घसरली; शिवसेनेचा प्रचार केल्यामुळे काढली खुन्नस, घराची पायरी तोडल्याने संताप
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा प्रचार केल्यामुळे आनंदनगर येथे राहणाऱ्या रंजना शेडगे यांच्या घराची पायरी तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला. शेडगे या राजन विचारे यांच्या प्रचारात पहिल्या दिवसापासून सक्रिय सहभाग घेत आहेत. याचा राग मनात धरत महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी खुन्नस काढली असल्याचा आरोप यावेळी शेडगे यांनी केला.
दरम्यान म्हस्के यांची प्रचारात पायरी घसरली असल्याने ठाणेकरांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मतदानाला अवघे दोनच दिवस शिल्लक असताना राज्यातील मिंधे सरकारकडून विरोधकांवर दबावतंत्र वापरण्यास सुरुवात झाली आहे. ठाण्यात आपला पराभव समोर दिसू लागल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकत्यांना नोटिसादेखील बजावल्या जात असून दडपशाहीचे राजकारण सुरू झाले आहे.
ठाण्यातील कोपरीजवळील आनंदनगर येथे शिवसेनेच्या रणरागिनी रंजना शेडगे गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. नरेश म्हस्के हे याच परिसरात राहात असून त्यांच्या कार्यालयाला लागूनच शेडगे याचे घर आहे. रंजना शेडगे या शिवसेनेच्या निष्ठावान रणरागिणी आहेत. ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांचा प्रामाणिक प्रचार त्या करत आहेत. याचाच राग मनात धरून म्हस्के यांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून घराची पायरीच तोडली. या जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेत म्हस्के यांच्या विकृतीचा समाचार घेतला.
मतदानानंतरच पायरी बांधणार
आम्ही घरोघरी शिवसेनेचा, मशालीचा प्रचार करीत आहोत. या प्रचाराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा राग त्यांनी मनात ठेवला. त्यांनतर गुरुवारी अचानक महापालिकेचे कर्मचारी आले आणि नोटिसा न देता काही मिनिटांतच आमची पायरी तोडून गेले. आता तोडलेली पायरी स्थानिक नागरिकांना दाखवण्यासाठी तशीच ठेवली असून मतदान झाल्यानंतरच पायरी बांधण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे रंजना शेडगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List