वाढवण बंदराचा घाट घालणाऱ्यांना धडा शिकवणार; मच्छीमार समाजाचा एकच निर्धार मशाल.. मशाल.. मशाल..
भूमिपुत्रांचा विरोध डावलून वाढवण बंदराचा घाट घालणाऱ्या मोदी व खोके सरकारला धडा शिकवण्याचा निर्धार मच्छीमारांनी केला आहे. अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने याबाबत पत्रकार परिषद घेत आपला जाहीर पाठिंबा शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिला आहे. हा प्रकल्प आणून मासेमारांच्या संसाराची राखरांगोळी करणाऱ्यांना तडाखा द्या.. आणि लोकसभा निवडणुकीत विजयाची धगधगती मशाल पेटवण्यासाठी शिवसेनेला मतदान करा, असे आवाहनच पालघर जिल्ह्यातील भूमिपुत्रांना केले आहे. त्यामुळे मिंध्यांच्या उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.
वाढवण बंदर होऊ नये यासाठी पालघरवासीय गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहे. या लढ्यात शिवसेना कायम भूमिपुत्रांच्या सोबत आहे. मात्र उद्योगपतींच्या फायद्यासाठी स्थानिकांचा विरोध चिरडून केंद्र सरकार खोके सरकारच्या मदतीने हा प्रकल्प पुढे रेटत आहे. सरकारच्या या जुलमी कारभाराविरोधात कायमच आवाज उठवणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर लोकसभेच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत पुन्हा एकदा हा प्रकल्प हाणून पाडू आणि स्थानिकांना न्याय देऊ अशी गर्जना केली आहे. याची दखल घेत अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी जाहीर पत्रक काढत शिवसेनेचे आभार मानले आहेत. तसेच भूमिपुत्रांच्या कायम पाठीशी असलेल्या शिवसेनेला पालघर लोकसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी मशाल चिन्हाचे बटण दाबण्याचे आवाहनच त्यांनी मच्छीमार समाजाला केले आहे.
भारती कामडी, राजन विचारे संसदेत आपली लढाई लढतील
पालघर लोकसभेच्या उमेदवार भारती कामडी व ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांना मतदान केल्यास शिवसेनेचे दोन्ही उमेदवार संसदेत जाऊन भूमिपुत्रांच्या प्रश्नांवर लढाई लढतील असा विश्वासदेखील देवेंद्र तांडेल यांनी व्यक्त केला.
बहिष्कार टाकणे हिताचे नाही
विरोध डावलून हा प्रकल्प आणला जात असल्याने पालघरवासीयांमध्ये संतप्त भावना आहेत. अनेकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. मात्र मतदानावर बहिष्कार टाकणे हिताचे नसून सत्ताधाऱ्यांना याचा अप्रत्यक्षपणे फायदाच होईल. यासाठी मशाल चिन्हाला मतदान करून सत्ताधाऱ्यांना आपली जागा दाखवा असे आवाहन देवेंद्र तांडेल यांनी केले आहे.
वंचित आणि एमआयएममुळे भाजपलाच फायदा
वाढवण बंदर उभारणीविरोधात थेट भूमिका घेणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. यामुळे पालघर लोकसभेच्या उमेदवार भारती कामडी यांच्या मशाल चिन्हावर मच्छीमार समाजाने एकमताने मतदान करावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी केले आहे. वंचित बहुजन आघाडी तसेच एमआयएमसारख्या पक्षांमुळे भाजपला अप्रत्यक्षपणे फायदा होत असल्याचे चित्र मागील निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळाले आहे. त्यातूनच वाढवण बंदरासारखे प्रकल्प भूमिपुत्रांच्या माथी मारले जात आहेत. त्यामुळे भूमिपुत्रांच्या मतांची विभागणी न करता एकजुटीने वाढवण बंदर माथी मारणाऱ्यांना धडा शिकवा असे आवाहनदेखील त्यांनी केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List