धावत्या बसला भीषण आग, देवदर्शनाहून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू; 24 होरपळले
हरियाणातील नूंह जिल्ह्यामध्ये शुक्रवारी मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली. देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बसला आग लागली आणि या आगीमध्ये होरपळून एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला. तर 24 जण गंभीर जखमी झाले आहेत. कुंडली-मानेसर-पलवल एक्सप्रेस वे वर हा अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आगीमध्ये जळून खाक झालेल्या बसमध्ये जवळपास 60 प्रवासी होते. हे सर्व प्रवासी पंजाबमधील लुधियाना आणि होशियारपूरचे रहिवासी होते. बसमधील सर्व प्रवासी हे एकमेकांचे नातेवाईक होते आणि एका धार्मिक यात्रेसाठी उत्तर प्रदेशमधील मथुरा-वृंदावन, वाराणसी येथे गेले. देवदर्शन घेऊन परतताना मध्यरात्री दीडच्या सुमारास हरियाणातील नूंह जिल्यातून जाणाऱ्या कुंडली-मानेसर-पलवल एक्सप्रेस वे वर धावत्या बसला अचानक आग लागली.
बघताबघता आगीने रौद्ररूप घेतले आणि संपूर्ण बसला कवेत घेतले. आग लागली तेव्हा बहुतांश प्रवासी हे गाढ झोपेमध्ये होते. त्यामुळे त्यांना सावरायलाही वेळ मिळाला नाही. त्यामुळे मृतांचा आकडा वाढला.
दरम्यान, आगीची माहिती मिळताच पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. दुर्दैवाने या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून 24 गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने मेडिकल कॉलेज नलहड नूंहमध्ये दाखल केले आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक नरेंद्र बिझारणिया यांनी दिली. तसेच मृतांची अद्याप ओळख पटलेली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.
हरियाणातील कुंडली-मानेसर-पलवल एक्सप्रेस वे वर धावत्या बसला भीषण आग, देवदर्शनाहून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू; 24 होरपळले pic.twitter.com/eIgcYKUJyD
— Saamana (@SaamanaOnline) May 18, 2024
तरुणांनी पाठलाग करत दिली आगीची माहिती
दरम्यान, मध्यरात्री दीडच्या सुमारास घटनास्थळी मदतीस पोहोचलेल्या साबिर, नसीम, साजिद आणि एहसान यांनी या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. धावत्या बसला आग लागल्याचे दिसताच आम्ही आवाज देऊन बस थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालक आपल्याच तंद्रीत होता. अखेर आम्ही दुचाकीवरून बसचा पाठलाग केला आणि चालकाला बस थांबवण्यास भाग पाडले. तोपर्यंत संपूर्ण बसला आग लागली होती, अशी माहिती तरुणांनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List