शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र शहा, मोदी आणि अदानींचा होऊ देणार नाही! उद्धव ठाकरे यांची गर्जना

शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र शहा, मोदी आणि अदानींचा होऊ देणार नाही! उद्धव ठाकरे यांची गर्जना

गुजरात आणि गुजराती माणसाशी माझे वैर नाही, पण मोदींच्या जिवावर जे दोन-पाच मस्तवाल मराठी माणसाला प्रवेशबंदी करण्याची आगळीक करीत आहेत त्यांना एकच सांगतो, वेळीच सुधरा, नाहीतर तुमचे दरवाजे बंद करून तुमचं गाठोडं गुजरातला पाठविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही गेट  आऊट!

बाळासाहेबांचं नाव घेण्याची मोदी, तुमची लायकी नाही

मोदींना माझं आव्हान आहे, हिंमत असेल तर मला संपविण्याचा प्रयत्न करून पाहा. तुमचे हे घाणेरडे राजकारण महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्राच्या मातीतच गाडल्याशिवाय राहणार नाही

हा महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकरांचा आहे. तो शहा-मोदी-अदानींचा कदापि होऊ देणार नाही, अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. तुम्ही कितीही डोकी आपटा, तुमची डोकी फुटतील, पण माझा एकही मर्द मराठा फुटणार नाही, असे ठणकावतानाच सगळी सडलेली पानं माझ्या शिवसेना या वटवृक्षाने टाकून दिली आहेत. ही पानं कचरा गोळा करणाऱ्या गाडीवाल्याने तुमच्या गळय़ात घातलीत. भाजप हा कचरा जमाव पक्ष झाला आहे, असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला.

हिंदुस्थानातील हुकूमशाही शक्तींविरुध्द देशात परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे. त्याची प्रचिती आजच्या महाविकास आघाडीच्या सभेने दिली. या सभेला अभूतपूर्व गर्दी झाली होती. महाविकास आघाडीच्या विजयाची नांदी देणारी ही विराट जनसभा आहे अशी सुरूवात करत उद्धव ठाकरे यांनी सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मिंधे गट असा सर्वांचाच समाचार घेतला आणि येत्या 20 मे रोजी महाविकास आघाडीला भरभरून मते देऊन विजयी करा असे आवाहन केले.

मुंबईत आज छत्रपती शिवाजी पार्क येथे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत महायुतीचीही सभा झाली. त्या सभेशी तुलना करत उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबईत आज दोन सभा होताहेत. एका बाजूला आपण सगळे आणि दुसऱ्या बाजूला गद्दार आणि भाडोत्री, बेअकली आणि नकली जमलेत. इकडे असली शिवसेना, असली राष्ट्रवादी कॉंग्रेस, असली कॉंग्रेस व मित्र पक्ष त्यांची ही सभा आहे. तिकडे सगळे वत्ते भाडोत्री, उमेदवार भाडोत्री आणि माणसेही भाडय़ाने आणली आहेत, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. महाविकास आघाडीच्या सभेत एकतरी भाडखाऊ आहे का, हात वर करून सांगा, एकही नाही सर्व तिकडे गेलेत, असे ते म्हणाले.

ही लढाई आम्ही व्यासपीठावर जमलो त्यांची नाही. ही लढाई तुमची आहे. तुम्ही ठरवायला पाहिजे की, तुमचे भविष्य काय असणार आहे. तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे की गुलामी पाहिजे… तुम्हाला सगळं मोकळं पाहिजे, बोलण्याचा अधिकार पाहिजे, तुमचे तुम्हीच स्वामी व्हायला पाहिजे की मोदींचे लाचार व्हायला पाहिजे हे तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे आणि मला खात्री आहे ज्या तळमळीने मी तुमच्याशी बोलतो आहे कोरोना काळामध्ये मी जे जे बोललो ते तुम्ही ऐकलं कोरोना व्हायरसपासून म्हणूनच आपण वाचलो. तसंच आता या हुकूमशहाच्या व्हायरसपासून देशाला वाचवण्यासाठी हिंमत करून फक्त एका बोटाने या हुकूमशहाला गाडून टाका, अशी साद उद्धव ठाकरे यांनी घातली.

आता फक्त मोदी म्हणून उराल, पंतप्रधान नव्हे

मोदींनी अचानक रात्री आठ वाजता टीव्हीवर येऊन नोटबंदी जाहीर केली होती आणि देशाला फसवले होते. तुमच्याकडच्या चलनी नोटा आज रात्री 12 वाजल्यानंतर केवळ कागदी तुकडे राहतील. त्यांचे चलनी महत्त्व 12 नंतर रद्द करण्यात आले आहे. त्याला डिमोनिटायझेशन म्हणतात. आता 4 जूनला संपूर्ण देश डिमोदीनेशन करणार आहे. चलनी नोटा जसे कागदाचे तुकडे राहिले होते तसे मोदी फक्त मोदी म्हणून राहतील, देशाचे पंतप्रधान राहणार नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

चीन ढेंगेत घुसलाय, तिकडे  मोदी-शहा जायला तयार नाहीत

जणू काही देशाचे सर्व प्रश्न संपलेत. महागाई कमी झाली आहे. सर्वांना रोजगार मिळाला आहे. सर्व खाऊन पिऊन सुस्त पडलेत अशा वातावरणात भाजपावाले वावरताहेत. चीन तिकडे ढेंगेत आडवातिडवा घुसलाय, तिकडे मोदी किंवा अमित शहा कुणीही जायला तयार नाही. सर्व भाडोत्री गद्दार घेऊन उद्धव ठाकरेंना संपवायला मुंबईत आले आहेत. संपवून दाखवाच. मी आव्हान देतोय. मोदींनी हिंमत असेल तर संपवण्याचा प्रयत्न करून बघावाच, महाराष्ट्र त्यांचे राजकारण इथल्या मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत इशार उद्धव ठाकरे यांनी दिला.

व्यासपीठावर आल्यानंतर उद्धव ठाकरे आणि अन्य मान्यवरांनी महापुरुषांच्या तसबिरींचे पूजन केले. तो धागा पकडून उद्धव ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसबिरींचे व्यासपीठावर पूजन केले. कारण हा महाराष्ट्र शिवराय आणि शाहू-फुले-आंबेडकर यांचा आहे. तो मोदी-शहा-अदानींचा आम्ही कदापि होऊ देणार नाही. कितीही प्रयत्न करा, कितीही डोकी आपटा. डोकी फुटतील, पण महाराष्ट्रातील मर्द मराठा जो हिंमतवान आहे, तो एकही फुटणार नाही. भाजपमध्ये सर्व गद्दार घेताय ते घ्या, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

भाजपा हा कचरा जमाव पक्ष

निसर्गाचा नियम आहे. ऋतू येतात ऋतू बदलतात. पाने उगवतात आणि सडतात. सडलेली पाने झडलीच पाहिजेत. तोपर्यंत नवीन अंकुर फुटत नाही. शिवसेना या वृक्षाने सडलेली पाने टाकून दिली आणि कचरा गोळा करणाऱ्या गाडीवाल्याने ती भाजपच्या गळय़ात टाकली आहेत, असा घणाघात करतानाच, भाजपा हा कचरा जमाव पक्ष झालाय, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. भाजपा हा भाडोत्री आहे, भाकड आहे, भेकड आहेच पण कमळाबाई आहेच आहे, अशी खिल्लीही त्यांनी उडवली.

मुस्लिम बांधव आघाडीकडे येऊ लागल्याने मोदींच्या पोटात दुखतेय

दरवेळेला निवडणूक आल्यानंतर मोदी हिंदू-मुस्लिम करतात आणि आता तर महाविकास आघाडीसोबत मुस्लिम बांधव येत असल्याने मोदींच्या पोटात दुखतेय, असे ते म्हणाले.  हिंदू-मुस्लिम भेदभाव करेन तेव्हा राजकीय जीवनाचा त्याग करेन असे परवाच्या मुलाखतीत मोदी म्हणाले. खरंतर त्यांनी तसा त्याग कधीच करायला हवा होता. मोदी मुस्लिमांना देशद्रोही ठरवतात, घुसखोर म्हणतात आणि दावा करतात की, हिंदू मुस्लिम भेदभाव करत नाही. मग काय आम्ही करतो? असे उद्धव ठाकरे म्हणाले. माझे बालपण मुस्लिमांसोबत गेले. अडोसपडोस मुस्लिम रहायचे. मीसुध्दा ताजियाखालून गेलेलो आहे. ईदच्या दिवशी आमच्या घरी जेवण बनत नव्हते. मुस्लिम कुटुंबियांकडून जेवण येत होते, असे मोदी मुलाखतीत म्हणाले. मग काहीतरी खाल्ल्यामीठाची जाण ठेवा, असा खोचक सल्लाही उद्धव ठाकरे यांनी दिला. मुस्लिमांकडून जेवण येत होते तर त्याचा मेनूपण सांगा आणि तुम्ही तो खाल्ला होता का नव्हता? मग अमित शहांनाही सांगा  तुम्ही काय खाल्ले होते ते? अशी खिल्लीही त्यांनी उडवली.

मुंबईकर संकटात असतात तेव्हा त्यांना मदत करायला शिवसैनिक धावून जातात भाजपचे कार्यकर्ते नाहीत, याचीही जाणीव उद्धव ठाकरे यांनी यावेळी करून दिली. आग लागली, पूर आला, अपघात झाला, बॉम्बस्फोट झाला तर शिवसैनिक मदतीसाठी जातात. त्यावेळी ते कुणाला तू मराठी आहेस की गुजराती, हिंदू आहेस की मुसलमान, उत्तर भारतीय आहेस की दक्षिण भारतीय, असे विचारत नाहीत. अनेकदा अशा बचावकार्यात शिवसैनिकांनी जीवही गमावला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

जिथे जातोय तिथे लोपं म्हणताहेत…या हुकूमशहाला गाढा

नकली शिवसेना मुद्दय़ावरून उद्धव ठाकरे यांनी आजही मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. कठीण काळात मदत करणाऱ्या शिवसेनेलाच नकली म्हणता अशी विचारणा त्यांनी केली. वडील चोरले, पक्ष चोरला, चिन्ह चोरले तरी महाराष्ट्रातील लोक उद्धव ठाकरे यांच्यासोबत का आहेत असा प्रश्न मोदींना पडलाय. जिथे जातोय तिथे गर्दी होतेय आणि लोक समोरून सांगताहेत, आम्ही शिवसेनेसोबत आहोत, लढा आणि या हुकूमशहाला गाढा…या हुकूमशहाला गाढा, असा अनुभव उद्धव ठाकरे यांनी सांगितला. या जनतेचीच लढाई आपण लढतोय असेही ते पुढे म्हणाले.

प्रमोद महाजन असते तर

दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांना यावेळी भाजपने मुंबईत उमेदवारी दिली नाही. त्यावरूनही उद्धव ठाकरे यांनी टीका केली. प्रमोद महाजन असते तर मोदी हे नाव दिसले नसते, मोदी पंतप्रधान झाले नसते, असे ते म्हणाले. ईडीच्या धाडी ज्यांच्यावर पडल्या त्यांना उमेदवारी देता आणि पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारता? याबद्दल त्यांनी आश्चर्यवजा संताप व्यक्त केला.

सभेला रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे उपस्थित होते. व्यासपीठावर आपचे नेते संजय सिंग, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, दिवाकर रावते, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, उपनेते सचिन अहिर, खासदार प्रियांका चतुर्वेदी, आमदार अॅड. अनिल परब, सुनील प्रभू, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, सुरेश शेट्टी, प्रदेश कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान हे नेते होते. शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी सूत्रसंचालन केले.

शोले चित्रपटात गब्बरसिंग सांगतो दूर गाव मे आधी रात बच्चा रोता है तो मॉं कहती है बेटो सो जा नही तो गब्बरसिंग आ जायेगा. तशीच जनता मोदींना सांगतेय, आम्हाला भूक लागलीय. आम्हाला अन्न पाहिजे. आम्हाला नोकऱ्या पाहिजे. सुरक्षा पाहिजे. मोदी सांगतात, गप्प बसा नाहीतर मुसलमान येतील.

भ्रष्टाचार करा, जेवढं खायचंय तेवढं खा, पण खाऊन भाजपात या, तुम्हाला काहीही होणार नाही. तुमचा बालही बाका होणार नाही. ये मोदी की गॅरंटी है… या सगळय़ा गॅरंटय़ा…करंटी गॅरंटी आता बस्स झाली.

मोदींना प्रचाराची दिशाच सापडत नाही

यंदाची ही पहिलीच निवडणूक आहे ज्यात पंतप्रधान मोदींना प्रचाराची दिशाच सापडत नसल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. आपण काहीही बोललो तरी देशातील जनता ऐकेल असा उन्माद मोदींना चढला होता. त्यांनी 400 पारचा नारा दिला, त्यावर महाविकास आघाडीने ‘अब की बार भाजप तडीपार’ असा नारा दिल्यावर ते चिडीचूप झाले. मग घराणेशाहीचा मुद्दा काढला. त्यांना वाटले उद्धव ठाकरे गप्प बसतील. मोदी कोणत्या घराण्यातले आहेत माहीत नाही, त्यांच्या घराण्यावर कोणाचे संस्कार आहेत हेसुद्धा माहीत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज ज्या मातीत जन्माला आले त्याच मातीत ठाकरे घराणे जन्माला आले आणि औरंगजेब जन्मला त्या मातीत मोदी जन्माला आले, असे शरसंधान उद्धव ठाकरे यांनी केले. मोदी आज महाराष्ट्रातील गल्लीबोळात फिरत आहेत, मुंबईतला गल्लीबोळ धुंडाळताहेत. औरंगजेबही असाच हिंदवी स्वराज्य काबीज करण्यासाठी आग्रा सोडून महाराष्ट्रात आला होता. महाराजांनंतर 27 वर्षे झुंजला, पण पुन्हा आग्रा बघू शकला नाही. महाराष्ट्राने इथेच त्याला मूठमाती दिली, अशा महाराष्ट्राच्या इतिहासाचीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी मोदींना आठवण करून दिली.

मोदींची असलीयत काढावी लागेल

शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला नकली म्हणता, मोदीजी तुमची असलीयत काढावीच लागेल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. एका व्यासपीठावर या आणि सात पिढय़ांची वंशावळ ठेवा. मी सुद्धा ठेवतो. आमच्या सात पिढय़ांनी महाराष्ट्रासाठी काय केले ते सांगतो. तुमच्या सात पिढय़ांनी देशासाठी काय केले ते सांगा, असे आव्हान देतानाच, तुम्ही कोण आम्हाला सर्टीफिकेट देणारे? ब्रम्हदेवाची बाप आहात का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

मोदींना 40 पेक्षा जास्त खासदार दिले याचा पश्चात्ताप होतोय

काय म्हणून मते मागता तुम्ही महाराष्ट्रात येऊन? काय अधिकार आहे तुम्हाला? काय केलेत महाराष्ट्रासाठी? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी मोदींना केला. महाराष्ट्राने मोदींवर प्रेम करून दोन वेळा त्यांना 40 पेक्षा जास्त खासदार दिले, त्यात शिवसेनाही सामील होती याचा पश्चात्ताप आपल्याला होतोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

बाळासाहेबांचे नाव घेण्याची मोदींची लायकी नाही

पंतप्रधान झाल्यानंतर मोदी महाराष्ट्र लुटायला निघाले. मुंबई लुटली. हेच का तुमचे बाळासाहेबांचे विचार? असा संतप्त सवाल करतानाच, बाळासाहेबांचे नाव घेण्याची तुमची लायकी नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. हिंदुहृदयसम्राट हा शब्द नीट उच्चारायला शिका. तो शब्द बाळासाहेबांना भक्तांनी दिला नव्हता, भक्त तर लाखो आहेत. जनतेने त्यांना हिंदुहृदयसम्राट म्हटले, असेही उद्धव ठाकरे यांनी बजावले.

ईडी मिंधेंची चौकशी का नाही करत?

भाजपचा एक आमदार आहे गणपत गायकवाड. त्याने पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला आणि प्रेसने जेव्हा त्यांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले हो, मी गोळीबार केला. पण जर या मिंध्याच्या हातामध्ये राज्य राहिलं तर महाराष्ट्रामध्ये गुंडाराज सुरू होईल, असे ते म्हणाल्याकडे लक्ष वेधत उद्धव ठाकरे यांनी हल्ला चढवला. केजरीवालजी, ऐकीव माहितीवर तुमच्यावर कारवाई करण्यात आली, पण त्या गणपत गायकवाडने तर मिंधेंकडे माझे करोडो रुपये आहेत, असा थेट आरोप केला होता. त्यांचे स्टेटमेंट चॅनेलकडे आहे, वृत्तपत्रातही आलेलं आहे. मग ईडी का नाही एकनाथ शिंदेंची चौकशी करत? केवळ तुमच्याकडे आले म्हणजे पवित्र झाले हीच का तुमची गॅरंटी, असा खरमरीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

पंतप्रधान दगडधोंडा असेल, माझा देश नाही

देश म्हणजे आहे तरी काय? भारतमाता की जय बोलतो ती आहे तरी कुठे? अशी विचारणा करत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नाशिकमधील सभेचा किस्सा सांगितला. ते म्हणाले की, नाशिकमधील सभेमध्ये मोदींनी हिंदू-मुस्लिम मुद्दय़ावर बोलायला सुरूवात केली तेव्हा एक शेतकरी उभा राहिला आणि त्याने कांद्यावर बोला अशी मागणी केली. शेतकरी कांद्याला भाव मागतोय, निर्यातबंदी उठवायला सांगतोय. त्याचे न ऐकता मोदी भारतमाता की जय, भारतमाता की जय म्हणाले. मग तुमची भारतमाता नेमकी आहे तरी कुठे? असे उद्धव ठाकरे म्हणाले. देशातील शेतकरीसुध्दा भारतमाताच आहे,  मणिपूरमध्ये ज्या महिलांचे धिंडवडे काढले गेले त्यासुध्दा भारतमाताच आहेत. देश म्हणजे देशातली माणसे आहेत. दगडधोंडे म्हणजे देश नाही. कदाचित पंतप्रधान दगडधोंडा असू शकेल पण माझा देश दगडधोंडा होऊ शकत नाही, अशा भावनाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या.

मुंबईला भिकारी करण्याचा तुमचा डाव आहे

तुमचा महाराष्ट्रावरचा आकस पदोपदी दिसतोय. महाराष्ट्राची राजधानी मुंबई तुम्ही भिकारी करायला निघाला आहात. महाराष्ट्रातले उद्योगधंदे तुम्ही गुजरातला पळवून नेले, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी मोदींवर जोरदार हल्ला चढवला. परवा तुमचा रोड शो झाला. उन्माद काय असतो तो बघायला मिळाला. जिथे दोन दिवसांपूर्वी होर्डिंग कोसळून अनेकजण मृत्युमुखी पडले. त्यांचं रक्तही सुकलं नव्हतं. त्याच विभागामध्ये ढोलताशे बडवत, वाजतगाजत, फुलं उधळत तुम्ही स्वतःचा रोड शो केलात. मोदी, एवढे निर्दयी झालात तुम्ही?

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;