एकच निर्धार! हुकूमशाहीचा व्हायरस गाडून टाकणार…4 जूनला देश मोदीमुक्त होणार!! बीकेसीच्या मैदानावर महाविकास आघाडीची विराट सभा

एकच निर्धार! हुकूमशाहीचा व्हायरस गाडून टाकणार…4 जूनला देश मोदीमुक्त होणार!! बीकेसीच्या मैदानावर महाविकास आघाडीची विराट सभा

महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या साक्षीने विराट जनसमुदायाशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, हुकूमशहाच्या व्हायरसपासून देशाला वाचवण्यासाठी हिंमत करून फक्त एका बोटाने या हुकूमशहाला गाडून टाका, आणि जिथे जिथे शिवसेनेची मशाल आहे ती मशाल यांच्या बुडाला अशी लावा की, पुन्हा हे महाराष्ट्रात येता कामा नयेत. जिथे काँग्रेसचा हात आहे तो हात यांच्यावर असा बसला पाहिजे, ते पुन्हा उठता कामा नयेत. आणि तुतारी अशी वाजली पाहिजे की, यांची भीतीने बोबडी वळली पाहिजे. एकजुटीने हुकूमशाहीविरुद्धचा लढा नुसता लढायचा नाही, तर तो जिंकायचा आहे. आणि तो जिंकणारच.

दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी महाराष्ट्राने वज्रमूठ आवळली आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या भक्कम एकजुटीचे विराट रूप आज मुंबईत पाहायला मिळाले. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचार तोफा उद्या थंडावत आहेत. त्याआधी महाविकास आघाडीची संयुक्त प्रचारसभा आज बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावर झाली. या सभेला लाखोंचा जनसागर उसळला. याच जनसागराच्या साक्षीने मोदी सरकार आणि भाजपच्या हुकूमशाहीविरुद्ध वज्राघात करण्यात आला. हुकूमशहाच्या व्हायरसपासून देशाला वाचवण्यासाठी हिंमत दाखवा आणि फक्त एका बोटाने या हुकूमशहाला गाडून टाका, अशी साद यावेळी महाराष्ट्रातील तमाम जनतेला घालण्यात आली तेव्हा ‘हुकूमशहाला मोडीत काढणारच… 4 जूनला देश मोदीमुक्त होणारच’ असा बुलंद नारा गर्दीतून घुमला. ‘मोदी चले जाव, अब की बार भाजप तडीपार’ असे ठणकावून सांगणारीच ही सभा होती.

मोदींचा खतरनाक प्लॅन, वन नेशन, वन लीडर; अरविंद केजरीवाल कडाडले

नरेंद्र मोदी यांचा खतरनाक प्लॅन सुरू आहे. ‘वन नेशन, वन लीडर’ त्यांना हवे आहे. त्यामुळे एकाधिकारशाही, हुकूमशाहीने ते सर्व विरोधकांना जेलमध्ये टाकतील, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कडाडले. 75 वर्षे वयाची अट सांगत मोदींनी आडवाणींसह ज्येष्ठ नेत्यांना बाजूला केले. पुढील वर्षी 75 वर्षे झाल्यानंतर मोदी सत्ता सोडणार का, असा सवालही त्यांनी केला. दिल्लीत ‘आप’चे सरकार आल्यानंतर आम्ही वीज, पाणी, शिक्षण, औषधोपचार मोफत दिले. आता हे सर्व बंद करण्याचा डाव मोदींचा असल्याचेही ते म्हणाले.

दिल्लीतील ‘आप’चे सरकार हटवण्यासाठी मोदींनी खूप प्रयत्न केले, मात्र दिल्लीत जनतेने 2015 आणि 2020 मध्ये आपलाच पाठिंबा देत एकतर्फी सत्ता दिली. त्यामुळे आपल्याला हटवू शकत नसल्याने खोटय़ा केसमध्ये गुंतवून जेलमध्ये टाकल्याचा आरोपही अरविंद केजरीवाल यांनी केला. मी डायबेटिसचा पेशंट असल्याने मला रोज अनेक वेळा इन्सुलीन घ्यावे लागते. मोदींनी हे सर्व बंद केल्याने माझी शुगर 300 पर्यंत वाढली. त्यामुळे माझ्या लिव्हर, किडनीवर परिणाम झाला. अशाच प्रकारे विरोधकांना जेलमध्ये टाकून त्यांचे शरीर खराब करून त्यांना संपवून टाकण्याचा डाव असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. रशियात पुतीन यांनीदेखील विरोधकांना जेलमध्ये टाकून, तर काहींना मारून टाकल्यानंतर निवडणुका घेऊन ते विजयी झाले. मोदींची नीती अशीच असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. त्यांच्यावर इतक्या खालच्या पातळीवर टीका करण्याच्या प्रकाराचा त्यांनी निषेधही केला. सत्तेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी फोडली. त्यामुळे आता देश वाचवण्यासाठी भाजपविरोधात एकजुटीने उभे राहण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

संकटात बाळासाहेबांनी वाचवल्याचे विसरलात! पवारांनी मोदींना सुनावले

बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला संकटाच्या काळात वाचवले त्या बाळासाहेबांना तुम्ही विसरलात, त्यांचा पक्ष फोडलात, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना सुनावले. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणाऱया उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी शक्ती उभी केल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी मोदींना ठणकावले. मोदी आणि भाजपची हुकूमशाही, एकाधिकारशाही मोडीत काढून संविधान, लोकशाही आणि आपले मूलभूत हक्क वाचवण्यासाठी मोदी-भाजपला हटवावेच लागेल, असेही ते म्हणाले.

तुम्ही आमच्यावर भटकता आत्मा अशी टीका केली. या टीकेकडे महाराष्ट्रातील जनता ढुंकूनही पाहत नाही. मात्र एक लक्षात ठेवा ही भटकती आत्मा तुम्हाला सत्तेवरून बाजूला केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. दिल्लीचा चेहरामोहरा बदलेल्या केजरीवाल यांना जाणीवर्पूक जेलमध्ये टाकल्याचेही त्यांनी सांगितले. ही हुकूमशाही पद्धत आहे. जो सोबत येत नाही त्याला तुरुंगात टाकले जात आहे. मुख्यमंत्र्यांना आणि राज्यकर्त्यांना विविध प्रश्नावर धोरणं ठरवायची असतात. ती ठरवण्यासाठी केजरीवाल यांना तुरुंगात टाकलं. अनेक राज्यांच्या नेत्यांना तुरुंगात टाकलं. मी म्हणेन तीच पूर्व दिशा. मी म्हणजेच लोकशाही असं सुरू आहे. हे असंच सुरू राहिलं तर मोदी तुमचे आणि माझे अधिकार उद्ध्वस्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असा इशारा देत देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी भाजपला सत्तेवरून दूर करावेच लागेल, असे आवाहनच त्यांनी जनतेला केले.

सब का साथ, सब का विकास नाही, सब का सत्यानाश; खरगे यांनी घेतला खरपूस समाचार

2014 पासून नरेंद्र मोदी खोटं बोलून जनतेची दिशाभूल करीत आहेत. 2014 मध्ये सगळय़ांच्या खात्यात 15 लाख देतो सांगून सत्ता मिळवली. 2019 मध्ये शहीदांच्या नावावर सत्ता मिळवली. बुलेट ट्रेन आली नाही, करोडो नोकऱयाही आल्या नाहीत, मात्र बेरोजगारी आणि महागाई प्रचंड वाढल्याने सर्वसामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी झुठों के सरदार है. मोदींची घोषणा सब का साथ, सब का विकास नाही, तर सब का साथ, सब का सत्यानाश असल्याचा घणाघात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

‘इंडिया’ आघाडीला बदनाम करून पुन्हा एकदा सत्ता मिळवण्याचा मोदींचा प्रयत्न सुरू आहे. रोजगाराच्या नावाने जनतेची फसवणूक करणारे सरकार 30 लाख रिक्त पदे भरत का नाही? कारण यातील  15 लाख नोकऱया मागासवर्गीयांना मिळणार आहेत. मात्र मोदींना गरीब, मागासवर्गीय, आदिवासींचा तिटकारा असल्याने ही पदे भरली जात नाहीत, असेही ते म्हणाले. शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करणार होते ते केले नाही. दोन कोटी नोकऱया देणार होते त्या दिल्या नाहीत. देशाला फसवून तुम्ही सत्ता मिळवली, असा टोलाही त्यांनी लगावला. आमच्या सत्ताकाळात 52 रुपयांचे पेट्रोल आता 92 रुपये झालेय, 414 रुपयांचा गॅस 903 रुपये, 39 रुपयांचे दूध 60 रुपयांवर गेले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;