छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राशी घेतलेला पंगा तुम्हाला महागात पडेल; संजय राऊत यांचा इशारा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राशी घेतलेला पंगा तुम्हाला महागात पडेल; संजय राऊत यांचा इशारा

‘वैसे वैसे मंजर सामने आने लगे है, गाते गाते लोग चिल्लाने लगे है, अब कोई तालाब का पानी बदल दो, ये कमल के फूल मुर्झाने लगे है’  

पंतप्रधान मोदी यांचा गेले काही दिवस मुक्काम महाराष्ट्रात आहे. वारंवार मुंबईच्या रस्त्यावर आणि गल्लोगल्ली फिरतायत. एक लक्षात घ्या मोदीजी, आम्ही तुम्हाला रस्त्यावर आधीच आणले आहे. 4 जूननंतर तुम्हाला तुमचा आवडता झोला घेऊन हिमालयात पाठविण्याची व्यवस्था हा महाराष्ट्रच करणार आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राशी तुम्ही जो पंगा घेतलेला आहे तो तुम्हाला महागात पडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी दिला.

मोदी सर्वांना गॅरंटी देत असतात, पण आजची ही सभा नरेंद्र मोदींना गॅरंटी देतेय. मोदीजी, आप तो गयो. मोठा भाई, छोटाभाई, गांडाभाई, हा भाई, तो भाई… 4 जूननंतर कोण राहत नाही, असा टोला संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना लगावला. अरविंद केजरीवाल तुरुंगातून सुटून येतायत, त्यांच्याबरोबर संजय सिंह हेदेखील तुरुंगातून सुटून आलेत. हे संजय राऊतही तुरुंगातून सुटून आलेले आहेत. आता तुरुंग तुमची वाट पाहील. तोच तुरुंग, तीच ईडी, तीच सीबीआय, त्याच कोठडय़ा आता भाजप आणि त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांसाठी असल्याचा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला.

भाजप हा एक चोरबाजार

भाजप हा फक्त चोरबाजार आहे आणि त्या चोरबाजारात फक्त चोरीचा माल मिळतो. मुंबईत पण एक चोरबाजार आहे. भेंडीबाजारच्या पुढे त्या ठिकाणी अख्ख्या देशातील चोरलेला माल चकचकीत करून विकत मिळतो. तसा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी इथे एक चोरबाजार निर्माण केला आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र शहा, मोदी आणि अदानींचा होऊ देणार नाही! उद्धव ठाकरे यांची गर्जना

बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन पाप करू नका

मोदी शिवतीर्थावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन करणार आहेत. मोदीजी, असे करू नका. बाळासाहेबांच्या आत्म्याला यातना होतील. ज्या मोदींनी बाळासाहेबांची शिवसेना तोडली, फोडली, विकत घेण्याचा प्रयत्न केला, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली शिवसेना  म्हणण्याचे पाप केले, अशा मोदींनी  बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन दुसरे मोठे पाप करू नये. बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मा तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही. हा शाप तुम्हाला आधीच दिलेला आहे हे लक्षात ठेवा, असे संजय राऊत म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई – वडेट्टीवार

नागरिकांना खोटी आश्वासने देऊन मोदी-भाजपने देशात दोन वेळा सत्ता मिळवली. लोकांची फसवणूक केल्यामुळेच मोदींना महाराष्ट्रात 30 सभा-रोड शो घ्यावे लागत आहेत. बेरोजगारी, महागाईने देश जेरीस आला आहे. जीएसटीने सर्वसामान्य उद् ध्वस्त झाला आहे. जो त्यांच्याविरोधात बोलतो त्यांना तुरुंगात टाकले जाते. त्यामुळे देशाचे संविधान, लोकशाही वाचवण्यासाठी आता हे सरकार घालवावेच लागेल, ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

महाराष्ट्र भाजपमुक्त – नाना पटोले

विकासाच्या नावावर सत्ता मिळवलेल्या भाजपने जनतेची फसवणूक केल्यामुळे आता लोकांच्या मनात मोदी सरकारविरोधात प्रचंड असंतोष, उद्रेक आहे. भरतीमध्ये घोटाळा करून गोरगरीब सर्वसामान्यांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे मोदी झुठोंके सरदार है, असा घणाघात काँग्रेसचे नाना पटोले यांनी केला. मोदींकडून महाराष्ट्र लुटून गुजरातची तिजोरी भरण्याचे काम झालेय. त्यामुळे जनता आता मोदी सरकार बदलणारच. 4 जून रोजी महाराष्ट्र मोदी-भाजपमुक्त होईल, असा ठाम विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला.

आजही खुनी विचारधारा वरचढ ठरतेय – तुषार गांधी

जेव्हा बापूंच्या हत्येचा प्रयत्न विदर्भात केला जात होता, तेव्हा प्रबोधनकार ठाकरेंनी बापूंच्या सहकार्यांना याची माहिती दिली आणि जाहिरपणे इशारा दिला होता की, गांधींच्या हत्येचे प्रयत्न महाराष्ट्रात होत आहे, ते बंद व्हायला हवे. त्यातून बापू वाचले होते. त्यामुळे ठाकरे कुटुंबाच्या पूर्वजांचे जे उपकार आहे, ते मी इथे सांगणे गरजेचे असल्याचे महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी म्हणाले.  आजही ती खूनी विचारधारा वरचढ ठरण्याचा प्रयत्न करत आहे , असेही ते म्हणाले.

एकच निर्धार! हुकूमशाहीचा व्हायरस गाडून टाकणार…4 जूनला देश मोदीमुक्त होणार!! बीकेसीच्या मैदानावर महाविकास आघाडीची विराट सभा

मुंबई महाराष्ट्रासह देशात परिवर्तन होणार -नसीम खान

दहा वर्षांत खोटी आश्वाने देऊन सत्ता काबीज केली. बेरोजगारी प्रचंड वाढलीय. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. देश देशोधडीला लागलाय. त्यामुळे जनता आता भाजपला प्रश्न विचारते आमच्या अच्छे दिनाचे काय झाले. मात्र या प्रश्नांची भाजपकडे, मोदींकडे उत्तरे नाहीत. धार्मिक तेढ निर्माण केल्यानंतर आता ‘वोट जिहाद’ घेऊन आलेत. त्यामुळे निकम्मी गद्दार सरकारला बदलणार. देशाला वाचवण्यासाठी मुंबई महाराष्ट्रासह देशात परिवर्तन होणार असा विश्वास काँग्रेसचे नसीम खान यांनी व्यक्त केला.

बीकेसीतील मैदानावर शुक्रवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या विराट सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, दक्षिण-मध्य मुंबईचे शिवसेना उमेदवार अनिल देसाई, दक्षिण मुंबईचे शिवसेना उमेदवार अरविंद सावंत, उत्तर-पश्चिम मुंबईचे शिवसेना उमेदवार अमोल कीर्तिकर, उत्तर पूर्व मुंबईचे शिवसेना उमेदवार संजय दीना पाटील, उत्तर मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील  आणि उत्तर-मध्य मुंबईच्या काँग्रेस उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;