हा महाराष्ट्र नरेंद्र मोदींचं जुलमी शासन उलथवून टाकेल, महाविकास आघाडी 40 जागा जिंकेल; संजय राऊत यांचा हल्लाबोल
मुंबईत बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची महासभा झाली. या प्रचार सभेत शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) बुलंद तोफ म्हणजेच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी, अमित शहांसह भाजपवर हल्लाबोल केला आहे. मोदीजी आप तो गयो… आता तुमची वृद्धाश्रमात जाण्याची वेळ आहे, अशी तोफ संजय राऊत यांनी डागली. 4 जूननंतर देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीची ही विराट सभा होत आहे. आपल्या आघाडीतील सर्व पक्षांचे झेंडे इथे फडकताहेत. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान जे आता कार्यवाहक आहेत आणि 4 जूनंतर माजी पंतप्रधान होणार आहेत. त्यांचीही मुंबईत सभा आहे. मला कोणीतरी सांगितलं ही त्यांची शेवटची सभा आहे. गेले काही दिवस त्यांचा मुक्काम तसा महाराष्ट्रातच आहे. मुंबईत वारंवार येताहेत. रस्त्यावर, गल्लोगल्ली फिरताहेत. एक लक्षात घ्यात मोदीजी आम्ही तुम्हाला रस्त्यावर आताच आणलेलं आहे. आणि चार जूननंतर तुम्हाला तुमचा आवडता झोला घेऊन हिमालयात जावं लागेल, अशी व्यवस्था हा महाराष्ट्रच करणार आहे. या महाराष्ट्राला तुम्ही ओळखत नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राशी तुम्ही पंगा घेतलेला आहे आणि हा पंगा आता तुम्हाला महागात पडल्याशिवाय राहणार नाही. मोदी सगळ्यांना गॅरंटी देत असतात, ही आजची सभा मोदींना गॅरंटी देतेय. मोदीजी आप तो गयो… आप तो गयो… मोटा भाई छोटा भाई, गांडा भाई, हा भाई, तो भाई चार जूननंतर कोणी राहात नाही, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
अरविंद केजरीवाल हे तुरुंगातून सुटून येताहेत. त्यांबरोबरचे संजय सिंह हे तुरुंगातून सुटून आले आहेत. आणि हे संजय राऊतही तुरुंगातून सुटून आलेले आहेत. आता तुरुंग तुमची वाट पाहील. तोच तुरुंग, तीच ईडी, तोच सीबीआय, त्याच कोठड्या या भाजप आणि तुमच्यासाठी आहेत. भारतीय जनता पक्ष हा एक चोर बाजार आहे. त्या चोर बाजारात फक्त चोरीचा माल मिळतो. आपल्या मुंबईतही एक चोर बाजार आहे. भेंडी बाजाराच्या पुढे. अख्ख्या देशातला चोरलेला माल चकचकीत करून तिथे विकत मिळतो. तसा नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी इथे एक चोर बाजार निर्माण केला आहे. नरेंद्र मोदींच्या भाषणाची वाट पाहत होतो. पण अद्याप नरेंद्र मोदी शिवाजी पार्कला पोहोचलेले नाहीत. मी असं ऐकलंय शिवतीर्थावर जाऊन हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृति स्थळाला ते वंदन करणार आहेत. मोदीजी हे करू नका, बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला यातना होतील. ज्या मोदींनी माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तोडली, फोडली, विकत घेण्याचा प्रयत्न केला. आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीला बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणण्याचं पाप केलं. अशा मोदींनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृति स्थळावर जाऊन दुसरं मोठं पाप करू नये. बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मा तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही. हा शाप तुम्हाला आधीच देण्यात आलेला आहे, असं संजय राऊत म्हणाले.
नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांचे सगळे झुटोंके सरदार यांनी गेल्या दहा वर्षांत देशात विष पेरण्याचं काम केलं. नरेंद्र मोदींनी या देशासाठी काय केलं? नरेंद्र मोदींनी या हिंदुस्थानला एक नवा मंत्र दिला. काम धंदा मंदम… मंदी प्रचंडम… झिंदगी झंडम… फिरभी घमेंडम… मोदीजी चार जूननंतर ही घमेंड आम्ही उतरवणार. ही तुमची घमेंड चालणार नाही. नकली शिवसेना मिंधेची आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे या महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झालेलं पाप आहे. कालपर्यंत ज्या अजित पवारांना आपण भ्रष्टाचारी… भ्रष्टाचारी म्हणून चक्की पिसिंगला पाठवत होतात, त्याचं किसिंग आज मोदी घेताहेत. हा मिंधे आणि त्याचे चाळीस लोक सगळ्यात मोठे भ्रष्टाचारी आहेत. त्यांना तुरुंगात टाकायला निघाला होतात. आज ते तुमच्या बरोबर तुमच्या व्यासपीठावर आहेत. तुम्ही भ्रष्टाचारमुक्त हिंदुस्थान करायला निघाला होतात, आज भ्रष्टाचार हाच तुमचा मंत्र झालेला आहे. भ्रष्टाचार करा, व्यभीचार करा, बलात्कार करा आणि भारतीय जनता पक्षात येऊन सत्ता मिळवा, असा संदेश तुम्ही दिलेला आहे. हा देश हे सहन करणार नाही, असं संजय राऊत यांनी ठणकावलं.
महाराष्ट्रात माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उत्तम चाललेलं सरकार यांनी पाडलं. कारण आम्हाला विकास करायचा आहे. दुसऱ्याची पोरं मांडीवर घेऊन यांना विकास करायचा आहे. नागपूरचा थकला म्हणून ठाण्याचा आणला… त्याच्याकडून काही होईना म्हणून बारामतीचा बघितला… आणि तोही पुरेना म्हणून नांदेडवाल्यांचा हात धरला. आणि तरीही कमळाबाईच्या पोटी विकास काही जन्माला आला नाही. असे नामर्द लोक महाराष्ट्रवर राज्य करत आहेत. नरेंद्र मोदी असो की त्यांची लोक, गेल्या दहा वर्षांत मुंबईची महाराष्ट्राची त्यांनी प्रचंड लुट केली. आज ते महाराष्ट्रात कशा करता येताहेत? उद्या त्यांना पुन्हा सत्ता हवी आहे, उद्या त्यांना पुन्हे इथे महाराष्ट्र लुटायचा आहे आणि उद्या त्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्रावर घाव घालायचे आहेत. मुंबई तोडायची आहे, यासाठी त्यांना वारंवार महाराष्ट्रात यावं लागतंय. भविष्यात महाराष्ट्र खतम करण्याचं त्यांचं जे स्वप्न आहे, ते फार भयंकर पद्धतीने त्यांना कृतीत उतरवायचं आहे, असं संजय राऊत पुढे म्हणाले.
मित्रांनो आपण अत्यंत सावधपणे या वेळेला मतदान करायचं आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचं नेतृत्व राहुल गांधी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ज्याचं नेतृत्व शरद पवारसाहेब करत आहेत. आणि शिवसेनेचं नेतृत्व माननीय उद्धव ठाकरेसाहेब करत आहेत. या तिघांनी मिळून महाराष्ट्रात आणि देशात नरेंद्र मोदींसमोर भयंकर असं आव्हान उभं केलेलं आहे. आणि नरेंद्र मोदी कोणत्याही परिस्थितीत चार जूननंतर पंतप्रधान होत नाही, अशा प्रकारचा आत्मविश्वास जनतेत निर्माण केलेला आहे. आज महाराष्ट्रात जिथे-जिथे नरेंद्र मोदी जातील तिथे-तिथे शेतकरी, कष्टकरी त्यांना प्रश्न विचारतोय. म्हणून नरेंद्र मोदींनी आता हिंदू-मुसलमान, हिंदुस्थान-पाकिस्तान हा त्यांचा आवडीचा खेळ सुरू केला आहे. त्यात आपण पडू नये, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
उद्या प्रचार संपतोय आणि आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे. देशातील ही निवडणूक ऐतिहासिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जे या महाराष्ट्राचे सुपुत्र. अत्यंत गरीबीतून संघर्ष करून शिकून या देशाचे घटनाकार म्हणून ज्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना चारशे जागा निवडून आणून खतम करायची आहे. आपण कोणत्याही परिस्थितीत ते होऊ देता कामा नये. विशेषतः महाराष्ट्रावर ही जबाबदारी अधिक आहे. उत्तर प्रदेशनंतर सगळ्यात मोठं राज्य महाराष्ट्र आहे. लोकसभेचे 48 खासदार निवडून देणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे. आज संपूर्ण देश या महाराष्ट्राकडे आपेक्षेने पाहतोय. मला खात्री आहे या 48 पैकी किमान 40 जागा महाविकास आघाडी जिंकतेय आणि नरेंद्र मोदींचं जुलमी शासन उलथवून टाकतेय, ही भूमिका महाराष्ट्राने घेतली आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
नरेंद्र मोदी आपल्या वयाची 75 वर्षे सप्टेंबरमध्ये पूर्ण करत आहेत. आता तुमची वृद्धश्रमात जाण्याची वेळ आहे. या महाराष्ट्रात उत्तम वृद्धाश्रम आम्ही निर्माण केलेले आहेत. आम्ही तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही तिथून त्यानंतर हा देश कशा प्रकारे चालवतोय आणि पुढे नेतोय हे तुम्हाला पाहता येईल. गेली सत्तर वर्षे या देशावर काँग्रेस पक्षानं राज्य केलं. काही काळ अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. आणि प्रत्येकाने या देशाचा संविधानाचा आत्मा जपण्याचा प्रयत्न केला. पण नरेंद्र मोदींची दहा वर्षे देशात फक्त विष पसरवण्यासाठी निर्माण झाली. हे विष आता आपण संपवलं पाहिजे, असं आवाहन संजय राऊत यांनी जनतेला केलं.
कवी दुष्यंत यांच्या चार ओळी फार उत्तम आहेत. त्या नरेंद्र मोदींनीही ऐकाव्यात. कैसे कैसे मंजर सामने आने लगे है, कैसे कैसे मंजर सामने आने लगे है, गाते गाते लोग चिल्लाने लगे है, अब तो इस तालाब का पानी बदल दो, ये कमल के फूल मुरझाने लगे है, ये कमल के फूल मुरझाने लगे है… या देशात कमळाबाईचा नाश होण्याची वेळ आलेली आहे. महाविकास आघाडी, इंडिया आघाडी या देशातले आणि राज्यातले पुढचे राज्यकर्ते आहेत, हे मी खात्रीने सांगतो. आपण जास्तीत जास्त जागा या महाराष्ट्रातून संसदेत निवडून पाठवाव्यात आणि देशातील नरेंद्र मोदींचं हुकूमशाही शासन उलथवून टाकावं असं पुन्हा एकदा आवाहन मुंबईकरांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला करतो, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List