महाराष्ट्रच नव्हे, देशातील वातावरण बदललेलं; बीकेसीवर ‘इंडिया’ आघाडीची विजयसंकल्प सभा! – विजय वडेट्टीवार
महाराष्ट्रातील निवडणूक प्रचाराच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात महाविकास आघाडीची विराट सभा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील (बीकेसी) एमएमआरडीए मैदानावर होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ या सभेत धडाडणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह ‘इंडिया’ आघाडीतील दिग्गज नेते या सभेला संबोधित करणार आहेत. या सभास्थळाची विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पाहणी केली आणि आढावा घेतला. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, समारोपाच्या सभेसाठी आम्ही शिवतीर्थाची मागणी केली होती. त्यात मला जायचे नाही. मात्र ही प्रत्युत्तराची सभा नसून विजयसंकल्प सभा आहे. मुंबईतील सहाच्या सहा जागा महाविकास आघाडी जिंकणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी किंबहुना इंडिया आघाडीची ही समारोपाची सभा आहे. तानाशाही, हुकुमशाहीला संपवण्यासाठी, लोकशाही जीवंत करण्यासाठी आणि देशातील संविधानाचे रक्षण करण्यासाठी ही सभा आहे. या सभेतून देशभरात संदेश जाईल.
पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील 13 जागांवर मतदान होणार आहे. या सर्व जागांवर काँग्रेस आणि इंडिया आघाडीला भरभरून यश मिळेल, असा विश्वासही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बीकेसी येथे होणाऱ्या इंडिया आघाडीच्या सभास्थळाची पाहणी केली आणि आढावा घेतला. pic.twitter.com/FC8qin0LB3
— Saamana (@SaamanaOnline) May 17, 2024
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच नव्हे तर देशातील वातावरण बदलले आहे. लोकं मोदी आणि भाजपच्या सभांना वैतागले आहेत. तेच तेच भाषण, तोच तोच रटाळ मुद्दा ऐकायला का जायचं? असे लोकं म्हणत असून काहींनी तर किळस आल्याचे म्हटले आहे. लोकांना पंतप्रधानांच्या भाषणाची आवड आणि उत्साह राहिलेला नाही. त्यामुळे लोकांच्या मनात इंडिया आघाडी हाच पर्याय दिसतोय. देशाची सत्ता आम्ही नक्कीच हातात घेणार असून 4 तारखेला बदल दिसेल, असा ठाम विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List