मंगेशची ‘अप्सरा’… ओके मंधी फाईन! थिरकायला लावणारं धमाल खान्देशी गीत
>> मंगेश दराडे
‘टिकटिक वाजते डोक्यात’, ‘सूर निरागस हो’, ‘शेतीबागा माडाची गं वाडी’ अशी एकापेक्षा एक सुपरहिट गाणी मराठी चित्रपटसृष्टीला देणारे लोकप्रिय गीतकार मंगेश कांगणे आगामी ‘अप्सरा’ या चित्रपटाद्वारे संगीतकार म्हणून नशीब आजमावत आहेत. ‘अप्सरा’ तील ‘ओके मंधी फाईन हे ‘ड्रिमी’ गाणे सध्या धुमाकुळ घालतेय. गाण्यांमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी कूतूहल निर्माण होते, असे ते म्हणाले.
निसर्गाचे भरभरून वरदान मिळालेल्या कोकणात मंगेश कांगणे यांचे बालपण गेले. कोकणातील मातीमुळे त्यांची नाळ कवितेशी जोडली गेली. चारोळ्यांपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे चित्रपटगीतापर्यंत पोहोचला. याबद्दल ते सांगतात, गीतकार किंवा संगीतकार व्हायचे माझ्या ध्यानीमनी नव्हते. चारोळी, कविता आणि एकांकिकांसाठी गाणी लिहिताना पुढे ‘दुनियादारी’तील ‘टिक टिक वाजते…’ या गाण्यापासून गीतकार म्हणून मला इंडस्ट्रीत ओळख मिळाली. गेल्या दहा वर्षांत मी 125 हून अधिक गाणी लिहिली. अनेक दिग्गजांसोबत मला काम केले. ‘अप्सरा’च्या निमित्ताने आता संगीतकार म्हणून नवी इनिंग सुरू करतोय. स्वतः गाणं लिहिण्यापासून ते त्याला चाली लावून संगीत देण्यापर्यंतचा अनुभव रिफ्रेशिंग करणारा होता.
‘अप्सरा’ तील ‘ओके मंधी फाईन हे ‘ड्रिमी’ गाणे आहे. प्रेमात पडल्यावर सतत आपण त्या व्यक्तीचा विचार करतो. तिची गाठभेट झाल्यानंतर होणार आनंद…तुझ्यासाठी काहीही करेन, अशी मनातल्या मनातच दिलेली कमिटमेंट यात आहे. एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर आपले नाते कुठपर्यंत टिकेल याची धाकधूक ‘झक्कास वाटू लागलं’ या गाण्यातून व्यक्त केलीय तर ‘रिंगटोन’ हे धम्माल खान्देशी गीत सर्वांना थिरकायला लावणारे आहे.
गाणं लिहिताना कम्फर्टेबल असतो…
गाणं लिहिताना मी खूप कम्फर्टेबल असतो. चित्रपटाचे कथानक समजून घेतल्यानंतर त्याला अनुसरुन गाणी लिहितो. त्यासाठी मला हवा तेवढा वेळ घेतो. संगीतकार म्हणून काम करणे खूप जबाबदारीचे असते. संगीतकाराला वादक, कोरस, गायक, टेक्निशियन यांच्या सतत संपका&त राहावे लागते. गाणे तयार झाल्यावर ऐकून ते व्हिडीओसोबत कसे जातेय, हे देखील पाहावे लागते, असे मंगेश कांगणे सांगतात.
योगायोगाने संगीतकार
आधीपासूनच मी चाल लावून कविता लिहायचो. कोरोनानंतर दिग्दर्शक मंगेश देसाई यांनी मला काही जाहिरातींसाठी जिंगल्स बनवण्याची संधी दिली. त्याला चाली मीच लावल्या. दिग्दर्शक चंद्रकांत पवार यांना अप्सरा या चित्रपटासाठी एक गाणे हवे होते. चाल वगैरे लावून त्यांना मी त्या गाण्याचा ट्रक बनवून दिला. तो त्यांना आवडला. त्यांनी मला आणखी दोन गाणी दिली, अशाप्रकारे योगायोगाने मी संगीतकार झालो,
असे ते सांगतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List