ज्येष्ठांसाठी गृहनिर्माण प्रकल्प उभारताना सोयीसुविधा देणे बंधनकारक
सेवानिवृत्तीनंतर किंवा उतारवयात शांत निसर्गरम्य परिसरात वास्तव्य करण्याकडे ज्येष्ठांचा कल असतो. त्यांच्या या गरजा लक्षात घेऊन विकासक ज्येष्ठांसाठी स्वतंत्र गृहनिर्माण प्रकल्प राबवतात, मात्र हे प्रकल्प राबवताना विकासक ज्येष्ठांच्या गरजा लक्षात घेऊन सोयीसुविधा देत नाहीत. या पार्श्वभूमीवर महारेराने नवी नियमावली जाहीर केली असून यात इमारतीचे संकल्पचित्र, स्वयंपाकघर, स्नानगृह, उद्वाहन आणि रॅम्प, जिना आदी विविध घटकांबाबत काय काळजी घ्यावी याबाबतचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे विकासकांवर बंधनकारक असणार असून विक्री करारातही याचा समावेश करावा लागेल.
सेवानिवृत्त, जेष्ठ नागरिक या गृहनिर्माण प्रकल्पात प्रत्यक्षात राहायला गेल्यानंतर त्यांना अपेक्षित सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महारेराने फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठीच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी आदर्श मार्गदर्शक तत्त्वांच्या आदेशाचा मसुदा सूचना आणि मतांसाठी जाहीर केला होता. अनेकांनी या प्रस्तावाचे स्वागत करून अनेक उपयुक्त सूचना केल्या. यात ज्येष्ठ नागरिकांच्या संस्थांसोबत काही ज्येष्ठ नागरिकांनी स्वतंत्रपणेही सूचना केल्या आहेत. या निर्देशांना अंतिम स्वरूप देताना या सूचनांचा चांगला उपयोग झालेला आहे. पेंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने याबाबतची आदर्श मार्गदर्शक तत्त्वे यापूर्वी जारी केलेली होती. त्याचा आधार हे निर्देश तयार करताना घेण्यात आलेला आहे.
आवश्यक तिथे रॅम्प, पायऱयांमधील अंतर कमी असावे
एका मजल्यापेक्षा जास्त मजल्याच्या इमारतीला लिफ्ट आवश्यक, आवश्यक तेथे रॅम्पस, सर्व लिफ्टला दृश्राव्य व्यवस्था असावी, जिन्याच्या दोन्ही बाजूला हॅण्डल्स, जिना 12 पायऱयांपेक्षा मोठा असता कामा नये तसेच दोन पायऱयांमधील अंतरही फार असू नये, स्वयंपाकघरात गॅस प्रतिरोधक यंत्रणा असावी, सुरक्षा रक्षक ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित असावे, इमारतीच्या परिसरात आणि विशेषतः मुख्य दरवाजा, शौचालय, शयनगृहात आणि सार्वजनिक क्षेत्रात अलार्मची स्वतंत्र बटणं असावीत अशा काही तरतुदी सुचविण्यात आल्या आहेत. यापुढे सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठीचे गृहनिर्माण प्रकल्प उभारायचा असेल तर या नियमावलीचे पालन करूनच प्रकल्प उभा करावा लागेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List