मिंध्यांच्या दबावामुळे पोलिसांची दडपशाही; ठाण्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना शहर सोडण्याच्या नोटिसा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून नोटीस बजावण्यात आली असून त्यांना 15 ते 19 मे या कालावधीत विभागातून बाहेर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. या नोटिसांनंतर राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड हे आक्रमक झाले असून त्यांनी या दडपशाहीचा कडाडून विरोध केला आहे. पोलिसांनी सत्ताधाऱ्यांच्या तालावर बाहुल्यांप्रमाणे नाचू नये, विनाकारण कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, थोडे आवरते घ्यावे, विनाकारण नोटिसा बजावणे थांबवावे, ठाणे शहर बंद करू असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे.
ठाणे जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांत शिवसेना महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. त्यामुळे मिंधे गट आणि भाजपवाले सैरभैर झाले आहेत. त्यातूनच त्यांनी शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. निवडणुकीमध्ये मतदारांवर मिंधे आणि भाजपचा प्रभाव पडत नाही. त्यामुळे पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून नोटीस बजावली आहे. सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या या दडपशाहीचा विरोध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेत पोलिसांवर आरोप केले.
पदाधिकाऱ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसतानाही पोलिसांकडून नोटीस पाठवली जात आहे. पोलिसांची वागणूक चुकीची आहे. पोलिसांनी राजकीय गुलाम बनू नये. संविधानाने नागरिकांना कोणत्याही भागात राहण्याचे अधिकार दिले आहेत. पोलिसांनी आवरते घ्यायला हवे अन्यथा आम्ही वेगळी पावले उचलू. ज्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी शहर सोडण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत त्यांना मी कोठेही जाऊ देणार नाही. माझ्या गाडीत घेऊन फिरणार आहे. माझ्यावर काय कारवाई करायची ती करा, असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी देऊन या दडपशाहीचा निषेध केला.
मोक्काचे आरोपी पॅरोलवर बाहेर
ठाण्यात मोक्काचे आरोपी पॅरोलवर बाहेर आहेत. हत्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी सत्ताधारी पक्षाशी संबंधित असून ते मोकाट फिरत आहेत. त्यांची नावे माझ्याकडे आहेत. ते नागरिकांना दमदाटी करत आहेत. परंतु त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यांच्या नावाने नोटिसा काढाव्या असेही आव्हाड म्हणाले. ही निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठी होत आहे. परंतु लोकशाहीची हत्या सुरू आहे. या प्रकाराविषयी निवडणूक आयोगाला तक्रार करण्यात येईल. मतदान प्रचाराच्या दिवसांत पदाधिकाऱ्यांना प्रचार करण्यापासून दूर केले जात आहे, हा अन्याय आम्ही सहन करणार नाही असेही आव्हाड म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List