Lok Sabha ELection 2024 : मोदींच्या सभेसाठी आज पुन्हा मुंबईकर वेठीला
घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 15 निष्पाप बळी गेले. तरीही त्याच भागात पंतप्रधान मोदींनी बुधवारी रोड शो केला. त्यासाठी एलबीएस मार्गासह अनेक रस्ते बंद करण्यात आल्याने तसेच मेट्रो सेवा थांबवण्यात आल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. आता उद्या दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणाऱ्या मोदींच्या सभेसाठी मुंबईकरांना पुन्हा एकदा वेठीस धरले जाणार आहे.
सभेसाठी वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत मोठय़ा प्रमाणात बदल केले आहेत. शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 10 पर्यंत हे बदल राहणार असून पूर्ण दिवस मध्य मुंबईतील वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजणार आहेत.
दादर, माहीम, माटुंगा परिसरातील 14 ठिकाणी वाहने पार्क करण्यास उद्या बंदी असणार आहे. त्यात बाबासाहेब वरळीकर मार्ग ते हरी ओम जंक्शन, संपूर्ण केळुस्कर रोड दक्षिण आणि उत्तर शिवाजी पार्क परिसर, पांडुरंग नाईक रोड, दिलीप गुप्ते रोड, हनुमान सर्कल ते गडकरी जंक्शन, गंगाविहार जंक्शन ते आसावरी जंक्शन, कोतवाल गार्डन सर्कल ते आर. ए. किडवाई मार्ग, माटुंगा पूर्व, पोद्दार हॉस्पिटल ते बिंदू माधव चौक, पोदार हॉस्पिटल ते नारायण हर्डीकर जंक्शन अशा ठिकाणांचा समावेश आहे. त्याशिवाय अनेक मार्गही बंद करण्यात आले आहेत.
तयारीसाठीही रस्ते केले बंद
मोदींचा दादरमध्ये रोड शो आणि छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर सभा होणार आहे. त्यामुळे आजच अनेक रस्त्यांचा ताबा पोलिसांनी घेतला. रोड शो आणि सभेच्या तयारीसाठी वीर सावरकर, सिद्धिविनायक मंदिर मार्गावर पंतप्रधानांच्या ताफ्यात असणाऱ्या वाहनांची आज प्रॅक्टिस चालू होती. यामुळे सायंकाळी दादर परिसरातील नागरिकांना वाहतूककाsंडीचा सामना करावा लागला. मोदींच्या रोड शोची तयारी म्हणून डिव्हायडर आणि झेब्रा क्रॉसिंगचीसुद्धा रंगरंगोटी करण्यात येत असून त्यासाठी तासन्तास रस्ते वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. परिणामी मुंबईकरांना आजपासूनच वाहतूककाsंडीचा सामना करावा लागला.
धक्कादायक व्हिडीओ आला समोर, रोड शोत फसलेल्या प्रवाशांचा उद्रेक; बॅरिकेडस् तोडले
मोदींच्या रोड शोमुळे बुधवारी रात्री हजारो मुंबईकर घाटकोपर परिसरात अडकले. मोदींचा ताफा गेल्यानंतरही बॅरिकेडस् हटवले नाहीत. त्यामुळे प्रवाशांचा उद्रेक झाला आणि बॅरिकेडस् हटवत गर्दीनेच वाट मोकळी केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
मोदींच्या रोड शोसाठी मुंबईकरांना बुधवारी वेठीस धरले गेले. एलीबीएस मार्ग तसेच अन्य रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले. त्यातच सायंकाळी सहानंतर अचानक मेट्रो सेवा बंद करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे हजारो चाकरमानी घाटकोपर परिसरात फसले. घाटकोपरमधील रस्त्यांवर आणि मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. त्यात आज बुधवारी रात्रीच्या भीषण स्थितीबाबत धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.घाटकोपर एलबीएस मार्गावरील हा व्हिडिओ आहे. रोड शोमुळे एलबीएस मार्गाच्या दोन्ही बाजूला पोलिसांनी बॅरिगेट्स लावले होते. दुतर्फा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होते. त्यामुळे सामान्य प्रवाशांची घुसमट झाली. किमान दोन ते तीन तास हजारो लोकांचा खोळंबा झाला. त्यात मोदींचा रोड शो संपल्यानंतर, पोलीस मात्र सुस्त होते. सुरक्षेचे कारण पुढे करून लगेच बॅरिकेड्स हटवता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List