मोदींचा आत्मविश्वास ढासळलाय! शरद पवार यांची सणसणीत टीका
अर्थसंकल्पाबद्दल मोदींचे वक्तव्य मूर्खपणाचे आहे. अर्थसंकल्प हा कोणत्याही जाती-धर्माचा नसतो. संसदेत जो अर्थसंकल्प मांडला जातो तो देशाचा असतो. त्यामुळेच मुस्लिमांसाठी वेगळा अर्थसंकल्प हे जे त्यांचे म्हणणे आहे तसे कधीच होऊ शकत नाही.
नरेंद्र मोदी यांच्याकडे दुसरे सांगण्यासारखे काही नाही. त्यामुळेच लक्ष विचलित करण्याचे काम ते करत आहेत. ते सध्या जे बोलत आहेत त्यातील एक टक्कासुद्धा काही खरं नाही, असे सांगतानाच मोदींचा आत्मविश्वास ढासळलाय, अशी सणसणीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. जाती-धर्माचा विचार करून देश चालवता येईल का? असा सवालही शरद पवार यांनी केला.
नाशिक येथे गुरुवारी शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शरद पवार यांनी कृषिमंत्री असताना कांद्यासाठी काय केले? असा प्रश्न विचारणाऱ्या मोदी यांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. मी कृषीक्षेत्रासाठी काय केले, याचा नरेंद्र मोदी यांनी चांगलाच अनुभव घेतला आहे. हेच मोदी मुख्यमंत्री होते तेव्हा कृषी विषयावर माझ्याकडे यायचे, मला गुजरातला घेऊन जायचे. त्या वेळी अमेरिकेने त्यांना व्हिसा नाकारला होता, त्यांना इस्रायलला जाऊन शेती सुधारणेची माहिती घ्यायची होती, मी त्यांना घेऊन गेलो, कृषी तंत्रज्ञानाच्या गोष्टी सविस्तरपणे चार दिवस दाखवल्या. तेव्हा त्यांना विकासात रस होता. आता त्यांना फक्त राजकारणात रस उरला आहे, असा टोला हाणला.
निवडणुकीत पैशांचा बेसुमार वापर करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर ते म्हणाले की, माढा, बारामती, साताऱ्यात हे आम्हीही अनुभवले. याआधी लोकसभेला पैसे वाटपाचे ऐकलेले नव्हते, आता घरोघर जाऊन पैसे वाटणे या विरोधकांनी सुरू केलेय, असे त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्याबाबत विचारले असता, राज ठाकरे यांचे महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की स्थान काय, हे मला माहीत नाही, असे विधान शरद पवार यांनी केले.
पटेलांना सुनावले
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिरेटोपाशी महाराष्ट्राचं नातं आहे. तो आपला इतिहास आहे. मोदींना जिरेटोप घालणाऱ्यांनी लाचारीच्या सगळय़ाच मर्यादा सोडल्या आहेत. मात्र यापुढे काळजी घेऊ असे त्यांनी सांगितले हे चांगले झाले, असा निशाणा प्रफुल्ल पटेलांवर साधला.
घोषणा देणाऱ्या ‘त्या’ कार्यकर्त्याचा अभिमान
शेतकरी अस्वस्थ असताना पंतप्रधानांनी येथे येऊनही कांद्याच्या जिव्हाळय़ाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले, त्यावरून त्यांना शेतकऱ्याने विचारलं, हा काही गुन्हा आहे का? असा सवाल शरद पवार यांनी केला. तो कार्यकर्ता जर आमच्या पक्षाचा असेल तर मला त्याचा अभिमान आहे, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्याची पाठराखण केली. नाशिकमध्ये हे पहिल्यांदा घडलेलं नाही, याआधी राजकीय नेत्यांच्या सभेत कांदे फेकले गेले होतेच, अशी आठवण त्यांनी करून दिली.
मोदींच्या रोड शोचे लक्ष्य गुजराती वर्ग होता
मुंबईसारख्या शहरात रोड शो घेणं शहाणपणाचं लक्षण नाही. लोकांना तासन्तास थांबावं लागतं. वाहतुकीची स्थिती भयंकर होते. कालही तेच झाले. मोदींच्या रोड शोमुळे जनतेला मोठा त्रास झाला. मुंबईत इतरही मोठे रस्ते आहेत, तिथे हा रोड शो करता आला असता, पण भाजपच्या रोड शोचे लक्ष्य हा गुजराती वर्ग होता, हे स्पष्ट झालं. ज्या भागात हा रोड शो केला तिथे गुजराती वस्ती मोठी आहे, असे शरद पवार म्हणाले.
शिवसेना हाच मोठा पक्ष
नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी या मोदींच्या विधानाला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, शिवसैनिक हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच आहे, असे ते ठामपणे म्हणाले. छोटे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, हे मी शिवसेनेबद्दल बोललो नाही. कारण शिवसेना हा छोटा पक्ष नाही, तो महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्षांमध्ये क्रमांक एकचा पक्ष आहे. त्यांच्या विधानसभेत 58, आमच्या 52, तर काँग्रेसच्या 45 जागा आहेत, असे शरद पवार या वेळी म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List