सांडपाण्याच्या धबधब्यांमुळे पर्यावरणाला धोका; महाबळेश्वर नगरपालिकेचा गलथान कारभार चव्हाटय़ावर
नगरपालिकेचा भोंगळ आणि गलथान कारभार सातत्याने उघडा पडत आहे. हॉटेल व्दारकाजवळ नगरपालिकेने सांडपाणी उघडय़ावर सोडल्याने सांडपाण्याचे धबधबे शहराजवळ असलेल्या परिसरात दिसत आहेत. या सांडपाण्याच्या धबधब्यामुळे पर्यावरणाला धोका पोहचत आहेच, परंतु या परिसरात राहत असलेल्या नागरीवस्तीत डास आणि दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाबळेश्वर नगरपालिकेच्या या कारभाराकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
महाबळेश्वर तालुका हा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आहे. येथील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कडक कायदे करण्यात आले आहेत. या नियमांचे पालन येथील स्थानिक नागरिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांनीदेखील करणे आवश्यक आहे. नगरपालिकेकडून या नियमांचे उल्लंघन झाले तर त्यांच्यावरदेखील दंडात्मक कारवाई होऊ शकते. या बरोबरच या संस्थेचा कारभार करणारे जबाबदार अधिकारी यांच्यावरही दंडात्मक कारवाई केली जाते. आपल्या कर्तव्यात कसूर केल्याबद्दल महाबळेश्वर नगपालिकेवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने अनेक वेळा दंडात्मक कारवाई केली. परंतु, गेली अनेक महिने प्रदूषण नियंत्रण मंडळाने नगरपालिकेच्या कारभाराकडे दुर्लक्ष केले आहे.
येथील महावितरणच्या कार्यालयानजीक व व्दारका हॉटेलच्या परिसरात सांडपाण्याचा एक चेंबर आहे. या चेंबरमधून गेली अनेक महिने सांडपाणी उघडय़ावरून वाहत आहे. हे पाणी पालिकेनेच येथील जंगलात उघडय़ावर सोडले आहे. त्यामुळे या जंगलात सांडपाण्याचे धबधबे वाहू लागले आहेत. मोठा पाऊस पडतो, तेव्हा या सांडपाण्याचे प्रमाण वाढते व हे सांडपाणी जंगलातून मुस्लीम कब्रस्तानात जाते. यामुळे येथील मुस्लिम समाजात तीव्र संतापाची भावना आहे.
हे सांडपाणी मोठय़ा प्रमाणावर जंगलात सोडल्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होतच आहे. परंतु, या जंगलातील वन्यप्राणी जीवनदेखील धोक्यात आले आहे. या सांडपाण्यामुळे येथील तसेच नागरी वस्तीतील पाण्याचे स्त्रोतदेखील दूषित होत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List