नगरमधील मतदानाच्या टक्केवारीचा मेळ बसेना!
लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर नगर मतदारसंघातील टक्केवारीच्या आकडय़ांचा ताळमेळ बसायला तयार नाही. तब्बल तीनवेळा प्रशासनाच्या वतीने आकडय़ांची अदलाबदल करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा निवडणूक प्रशासनाने अंतिम आकडेवारी जाहीर केली. त्यामुळे आकडय़ांच्या खेळात काही गडबड झाली नाही ना, अशी चर्चा नगरकरांमध्ये सुरू होती.
नगर लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 13) मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर दोनवेळा निवडणूक प्रशासनाने मतदानाची आकडेवारी जाहीर केली. त्यानंतर मंगळवारी रात्री निवडणूक प्रशासनाने अंतिम आकडेवारी जाहीर करत मतदारसंघात सरासरी 66.61 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. यामध्ये राहुरी व पारनेर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. या दोन तालुक्यांत तब्बल 70 टक्के मतदान झाले.
नीलेश लंके हे आमदार राहिलेल्या पारनेर मतदारसंघात सर्वाधिक 70.13 टक्के मतदान झाले. त्यानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघात 70 टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघात शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी नीलेश लंके यांच्यासाठी बळ लावले होते. तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी सुजय विखेंसाठी ताकद लावली आहे. नगर शहरात 62.50 टक्के मतदान झाले आहे. श्रीगोंदा मतदारसंघात 67.90 टक्के, तर कर्जत-जामखेडला 66.61 टक्के मतदान झाले आहे. शेवगाव मतदारसंघात 63 टक्के मतदान झाले आहे.
वास्तविक पाहता नगर शहरामध्ये मागच्या वेळेच्या तुलनेमध्ये मतदान वाढले असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात सुरुवातीला जी आकडेवारी आली त्यामध्ये तसे दिसून आले नव्हते. प्रशासनाने दोनवेळा यामध्ये बदल केला त्यात मतदान वाढले होते. सुरुवातीला 62 टक्के मतदान झाले, असे सांगितले. त्यानंतर बदल केल्यावर पुन्हा एक टक्का मतदान वाढले व रात्री प्रशासनाने अंतिम आकडेवारी जाहीर केली, त्यामध्ये निवडणुकीचा आकडा 66.61 टक्क्यांवर गेला आहे.
एक लाख नवमतदार
नगर जिह्यामध्ये सुमारे एक लाख नव्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे त्यांचे मतसुद्धा निर्णायक ठरणार आहे. पण एकीकडे नगर मतदारसंघात तीनवेळा आकडेवारीत झालेला बदल पाहता प्रशासनावर दबाव टाकल्याची चर्चा सुरू आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणामध्ये आकडेवारीत बदल होत असेल तर नेमक्या आकडेवारीला दोन दिवस कसे लागतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List