Sunil Chhetri announces retirement : सुनील छेत्रीचा फुटबॉलला रामराम; भावुक व्हिडीओ शेअर करत निवृत्तीची घोषणा
हिंदुस्थानच्या फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. गुरुवारी सकाळी सुनील छेत्री याने सोशल मीडिया अकाऊंटवरून एक भावुक व्हिडीओ शेअर केला आणि फुटबॉलला रामराम करत असल्याची माहिती दिली. सुनील छेत्री 6 जून रोजी कुवैतविरुद्ध आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे.
I’d like to say something… pic.twitter.com/xwXbDi95WV
— Sunil Chhetri (@chetrisunil11) May 16, 2024
सुनील छेत्री याने हिंदुस्थानच्या अंडर-20 आणि अंडर-23 संघाकडून खेळताना विशेष ओळख बनवली होती. या बळावर त्याने 2005 मध्ये हिंदुस्थानच्या आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवले. पाकिस्तानविरुद्ध तो पदार्पणाचा सामना खेळला. पदार्पणाच्या सामन्यातच गोल करत छेत्रीने आगामी कारकिर्दीची झलक दाखवली.
दरम्यान, गेल्या 19 वर्षापासून तो हिंदुस्थानच्या संघाचा अविभाज्य भाग असून बायचुंग भूतिया याच्यानंतर त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली. सुनील छेत्री याने हिंदुस्थानच्या फुटबॉल संघाकडून 150 सामने खेळले असून यात त्याने 94 गोल केले आहेत. राष्ट्रीय संघाकडून खेळताना सर्वाधिक गोल करणाऱ्या पहिल्या चार खेळाडूंमध्ये सुनील छेत्री याचा समावेश होतो.
सुनील छेत्री याने सहा वेळा ‘एआयएफएफ प्लेयर ऑफ द इयर’चा पुरस्कार पटकावला आहे. 2011 मध्ये त्याला ‘अर्जुन पुरस्कार’ आणि 2019 मध्ये ‘पद्मश्री पुरस्कार’ देऊनही गौरविण्यात आला.
विराटची कमेंट
दरम्यान, सुनील छेत्री याच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. छेत्रीच्या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत असून विराट कोहली यानेही यावर कमेंट केली आहे. ‘मेरे भाई, हमें तुम पर गर्व है।’, अशी कमेंट विराटने केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List