हेटलिफ्टिंग! वेटलिफ्टर्सनी पुन्हा मान झुकवली, पदकांसाठी उत्तेजकांचा केला प्रयोग
वेटलिफ्टर्संनी पुन्हा एकदा देशाची आणि खेळाची शरमेने मान झुकवली आहे. गेल्या वर्षी नागरकोईल येथे झालेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत उत्तेजकांचा सर्रास वापर केला गेला होता तर यंदा जानेवारीत इटानगर येथे झालेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेतही पदक आणि नोकरीसाठी वाट्टेल ती उत्तेजक घेतल्याप्रकरणी एक-दोन नव्हे तर दहा खेळाडू दोषी आढळले होते. विशेष म्हणजे हे सर्वच खेळाडू पदकविजेते ठरले होते. या दहाच्या दहा खेळाडूंवर ‘नाडा’ने बंदी लादली आहे. या साऱया प्रकारामुळे वेटलिफ्टिंग खेळ आणि खेळाडूंचा क्रीडा जगतात तीव्र निषेध केला जात आहे.
वर्षाच्या प्रारंभी अरुणाचल प्रदेशच्या इटानगर येथे राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धा पार पडली होती. ही स्पर्धा उत्तेजकांच्या वापरांनी डागाळली गेली होती. या स्पर्धेत अनेक खेळाडूंची डोप टेस्ट घेण्यात आली होती आणि त्यात दहा पदकविजेते खेळाडू दोषी ठरले आहेत. यात सात पुरुष तर तीन महिला वेटलिफ्टर्सचा समावेश आहे. दोषी ठरलेल्या दहाही खेळाडूंवर ‘नाडा’ने अनिश्चितकालीन बंदी लादली आहे. एवढेच नव्हे तर या खेळात डोपचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात असल्यामुळे यावर आळा घालण्यासाठी गेल्या वर्षी नागरकोईल येथे झालेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत दोषी ठरलेल्या दहा विजेत्या वेटलिफ्टर्सच्या प्रशिक्षकांना तीन वर्षांच्या बंदीची शिक्षा ठोठावण्याची कारवाई हिंदुस्थानी वेटलिफ्टिंग महासंघाने केली आहे.
कितीही नियम बनवले, कितीही चाचण्या घेतल्या तरी वेटलिफ्टिंगमध्ये दिवसेंदिवस उत्तेजकांचा वापर वाढत चालला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाचे अक्षरशः अब्रूचे धिंडवडे काढले जात असतानाही प्रशिक्षकांच्या मदतीने खेळाडू मोठय़ा प्रमाणात उत्तेजक घेत असल्याचे समोर आले आहे.
उत्तेजकांत कॉकटेलचा वापर
या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत ‘नाडा’ने अनेक खेळाडूंच्या डोप टेस्ट घेतल्या होत्या. त्यात पदकविजेते खेळाडू प्रामुख्याने दोषी आढळले आहेत आणि पदके जिंकून नोकरी मिळवण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचेही उघडकीस आले आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे काही खेळाडूंनी तीन-चार उत्तेजकांचे कॉकटेल सेवन केल्याचे माहिती ‘नाडा’ने दिली. यात स्टेरॉइडसह ‘सार्म’ आणि ‘सिम्युलेंट’ या प्रतिबंधित उत्तेजकांचे सेवन केले गेले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही उत्तेजकांचे कॉकटेल घेण्याची हिंमत केली जात नाही ती या खेळातल्या खेळाडूंनी केली आहे.
कमी वयाच्या खेळाडूंचा ही अतिरेक
हरियाणाच्या सोमनाथ आणि अनुष या 18 ते 20 वर्षांच्या खेळाडूंनी कॉकटेल उत्तेजकांचे सेवन करून खळबळ माजवली आहे. त्यांच्या टेस्टमध्ये चार-चार वेगवेगळे सॅम्पल सापडल्यामुळे ‘नाडा’लाही धक्का बसला आहे. एका सॅम्पलमध्ये कधीही इतके ड्रग्ज कधीच सापडत नाहीत, अशी ‘नाडा’ने माहिती दिलीय. या दोन्ही खेळाडूंनी अनुक्रमे 109 आणि 67 किलो वजनी गटात कास्य मिळवले होते. तसेच दोषी आढळलेल्या खेळाडूंमध्ये देवीश्री (आंध्र प्रदेश), सागर (बिहार), मृण्मय गोगोई (आसाम), गौरव (पोलीस बोर्ड), राखी पुरोहित (राजस्थान), शीतल भाटी (हरियाणा), सुमित राजपूत (मध्य प्रदेश), सचिन पंवार (उत्तर प्रदेश) यांचाही समावेश आहे.
दहा प्रशिक्षकांनाही बंदीचा शॉक
वेटलिफ्टिंग खेळात राष्ट्रीय शिबिराबाहेर या खेळात डोपचा प्रकार वाढत असल्याची माहिती महासंघाला मिळाल्यामुळे त्यांनी 2023 मध्ये नागरकोईल येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत डोप टेस्ट मध्ये दोषी आढळलेल्या दहा खेळाडूंच्या प्रशिक्षकांवर बंदीची कारवाई करण्याचे धाडस दाखवले आहे. ज्या खेळात 18 ते 20 वर्षांच्या खेळाडूंनाही डोपचे धडे दिले जात असतील, यावर या खेळात उत्तेजकांची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत याची महासंघाला कल्पना आल्यामुळे त्यांनी ही कारवाई केली आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे कारवाई झालेले पाच प्रशिक्षक उत्तरेकडील हरियाणा, उत्तर प्रदेश आणि सेनादलातील आहेत. यांच्यावर 2026 पर्यंत बंदी असेल. त्यांना महासंघाच्या प्रशिक्षणाच्या कोणत्याही उपक्रमात सामील होता येणार नाही. महासंघाच्या प्रशिक्षण शिबिराबाहेर होत असलेल्या डोपिंगला रोखण्यासाठी प्रशिक्षकांवर बंदीची कारवाई केल्याची माहिती महासंघाचे सहदेव यादव यांनी दिली. संघाच्या राष्ट्रीय शिबिरात आणि स्पर्धेवर ‘नाडा’ची करडी नजर असते, पण अनेक खेळाडू थेट खेळायला येत असल्यामुळे डोपिंग रोखणे आव्हानात्मक असल्याचेही यादव म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List