टीम इंडियासाठी विदेशी गुरूच लकी, प्रशिक्षकपदासाठी स्टीफन फ्लेमिंगच्या नावाची चर्चा
प्रशिक्षक जॉन राईटच्या काळात 2003 साली टीम इंडियाने वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठली होती तर 2011 च्या जगज्जेत्या हिंदुस्थानी संघाचा गॅरी कर्स्टन प्रशिक्षक होता. विदेशी प्रशिक्षकांच्या कार्यकाळात हिंदुस्थानी संघाची कामगिरी नेहमीच उंचावलेली होती. त्यामुळे हिंदुस्थानी संघाच्या नव्या गुरूसाठी पुन्हा एकदा विदेशी नावाची चर्चा सुरू झाली आहे. अद्याप कुणीही अर्ज भरले नसले तरी चेन्नईला पाचवेळा आयपीएल चॅम्प बनविणाऱया स्टीफन फ्लेमिंगचे नाव पुढे आले आहे. तसेच हिंदुस्थानी संघासाठी जबरदस्त कामगिरी करणाऱया व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि गौतम गंभीरच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे बीसीसीआय टीम इंडियासाठी लकी ठरत असलेल्या विदेशी गुरूंची निवड करतात की देशी दिग्गजाच्या हातात हिंदुस्थानी संघाला सोपवतात, ते लवकरच कळेल.
बीसीसीआयने आपल्या संघासाठी नव्या गुरूचा शोध सुरू करताना सोमवारपासूनच अर्जाची प्रक्रिया सुरू केली, मात्र प्रशिक्षक निवडीची प्रक्रिया सुरू होऊन दोन दिवसही झाले नाहीत तोच न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू व ‘आयपीएल’मधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांच्या नावाची चर्चाही सुरू झाली आहे.
बीसीसीआयच्या अटींप्रमाणे नवे मुख्य प्रशिक्षक हे टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटमधील संघाला प्रशिक्षण देतील. त्यामुळे वर्षातील दहा महिने प्रशिक्षकांना संघासोबत राहणे गरजेचे आहे. त्यामुळे स्टीफन फ्लेमिंग या पदासाठी खरोखरच अर्ज करतात का, हे बघावे लागेल. ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2009 पासून चेन्नई संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले फ्लेमिंग हे राहुल द्रविड यांच्या जागी योग्य उमेदवार मानले जात आहेत. टीम इंडियाचा आता संक्रमणाचा काळ सुरू होणार असल्याने संघात सकारात्मक वातावरण निर्माण करून खेळाडूंकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी करून घेण्याची क्षमता फ्लेमिंगमध्ये आहे. चेन्नई संघासाठीचे त्यांचे यश पाहता ते या पदासाठी प्रबळ दावेदारही आहेत.
राईट, फ्लेचर, कर्स्टननंतर फ्लेमिंग?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएल स्पर्धेदरम्यान ‘बीसीसीआय’च्या अधिकाऱयांची स्टीफन फ्लेमिंग यांच्याशी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या पार्श्वभूमीवर अनौपचारिक चर्चा झालेली आहे. गेल्या 11 वर्षांत हिंदुस्थानला आयसीसीची एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. योगायोगाने हिंदुस्थानने आयसीसीच्या ज्या स्पर्धा जिंकल्या त्यावेळी विदेशी प्रशिक्षक होते. 2002 साली हिंदुस्थान चॅम्पियन्स ट्रॉफीचा संयुक्त विजेता ठरला. प्रशिक्षक होते जॉन राईट. मग 2011 साली हिंदुस्थान जगज्जेता ठरला, तेव्हा गॅरी कर्स्टन. त्यानंतर 2013 साली आपण पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलो. प्रशिक्षक होते डंकन फ्लेचर. त्यामुळे विदेशी कोच टीम इंडियाला लकी ठरतो, हे कुणीही सांगू शकतो. त्यामुळेच विदेशी कोचचा विचार केल्यास फ्लेमिंग आघाडीवर असेल. अजून सारे गुलदस्त्यात आहे. 51 वर्षीय फ्लेमिंगने चेन्नई व्यवस्थापनाशी फ्रेंचायझी सोडण्याच्या कोणत्याही विषयावर चर्चा केलेली नाही. उलट ते चेन्नईच्या प्रशिक्षकपदी कायम राहू इच्छित आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या जबाबदारीसाठी बीसीसीआय फ्लेमिंग यांची मनधरणी करणार का, असा प्रश्न क्रिकेटप्रेमींच्या मनात आतापासूनच घोळू लागला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List