अर्धा पिंप दारूने केला 106 जणांचा घात; दोन पिंप शिल्लक दारू पोलीस करणार नष्ट
मालाड-मालवणी विषारी दारूकांडाप्रकरणी सत्र न्यायालयाने बुधवारी चार जणांना दहा वर्षांचा सश्रम कारावास व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. जून 2015 मध्ये घडलेल्या या घटनेत अर्धा पिंप विषारी दारूने तब्बल 106 जणांचा जीव घेतला, तर 75 जणांना कायमचे अंधत्व दिले.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. स्वप्नील डी. तावशीकर यांनी हा निकाल जाहीर केला. शिल्लक विषारी दारू नष्ट करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती विशेष सरकारी वकील घरत यांनी केली. ही दारू पुठे ठेवली आहे, अशी विचारणा न्यायालयाने केली. गेली नऊ वर्षे ही दारू गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे. निकाल लागेपर्यंत दारू नष्ट करू नका, असे अंतरिम आदेश न्यायालयाने दिले होते. निकाल जाहीर झाला असल्याने ही दारू आता नष्ट करायला हवी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील घरत यांनी केला. यासाठी स्वतंत्र अर्ज करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले. या आरोपींची शिक्षा वाढवण्याची मागणी याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली जाईल. दहा आरोपींना निर्दोष सोडण्यात आले आहे. यातील ममता राठोड, ग्रेसी आंटी, प्रकाश पटेल, सुभाष गिरी व भारतभाई पटेल या पाच आरोपींना दोषी धरून शिक्षा ठोठवावी, अशी विनंतीही उच्च न्यायालयाकडे करण्यात येईल, अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली.
शेकडोंचा बळी; सदोष मनुष्य वध
या आरोपींनी प्रत्यक्ष हत्या केली नसली तरी विषारी दारूने माणसाचा जीव जाऊ शकतो हे त्यांना माहीत होते. त्यांना हत्येसाठी दोषी धरत जन्मठेपेची शिक्षा ठोठवावी, अशी मागणी सरकारी पक्षाने केली होती. न्यायालयाने या आरोपींना सदोष मनुष्य वधासाठी दोषी धरून शिक्षा दिली. गुन्हेगारी कट रचणे, गुह्यासाठी मदत करणे, मुंबई प्रतिबंधक कायदा यासाठीही न्यायालयाने या आरोपींना शिक्षा ठोठावली. यातील सदोष मनुष्य वध व गुन्हेगारी कटासाठी सर्वाधिक दहा वर्षांची शिक्षा आहे. या सर्व शिक्षा आरोपींना एकत्रित भोगायच्या आहेत.
शिक्षा झालेल्या आरोपींची नावे
राजू तापकर, डोनाल्ड पटेल, फ्रान्सिस डिमेलो व मन्सूर खान या आरोपींना न्यायालयाने दहा वर्षांचा सश्रम कारावास व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांची शिक्षा आरोपींना भोगावी लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
एका वर्षात तुरुंगाबाहेर येणार?
हे सर्व आरोपी गेली नऊ वर्षे कारागृहात आहेत. कारागृहातील कालावधी मूळ शिक्षेतून वजा केला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. वर्षभरात हे चारही आरोपी कारागृहाबाहेर येणे अपेक्षित आहे. या निकालाला सरकारी पक्ष उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवला तरच हे आरोपी एक वर्षात तुरुंगाबाहेर येऊ शकतात. अन्यथा उच्च न्यायालय शिक्षेचा जो कालावधी ठरवेल तेवढी वर्षे त्यांना कारागृहात राहावे लागेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List