विना क्रमांक, फॅन्सी नंबरप्लेट असणाऱया वाहनचालकांना दणका, राहुरी पोलिसांची धडक कारवाई; 46 हजारांचा दंड वसूल
विना क्रमांक तसेच आरटीओ नियमानुसार नंबरप्लेट नसलेल्या 76 दुचाकीची राहुरी पोलिसांनी धरपकड करून वाहनधारकांकडून 46 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. दरम्यान, नियम पायदळी तुडवून फॅन्सी नंबरप्लेट तयार करून देणारे तसेच जुन्या दुचाकीची खरेदी-विक्री करणाऱया दुकानदारांकडे पोलीस प्रशासनाने लक्ष वेधण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी नगर-मनमाड महामार्गावर तसेच राहुरी शहरात ठिकठिकाणी पोलीस पथकाकडून नियमाचे उल्लंघन करणाऱया दुचाकी चालकावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. नगर-मनमाड महामार्गावरील जिजाऊ चौक, पाण्याची टाकी, शनिमंदिर, खळवाडी चौक, बारागाव नांदूर चौक, शनिशिंगणापूर फाटा या ठिकाणी 25 पोलीस व 65 होमगार्ड मिळून एकूण 6 पथकांकडून नाकाबंदी करण्यात आली होती. या पथकाने दुपारपर्यंत 76 दुचाकी चालकांकडून ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात 46 हजार रुपयांचा दंड वसूल केला. या वाहनधारकांकडून तत्काळ नंबर प्लेट बसवून सोडून देण्यात आले. या कारवाईत चार मोटारसायकलचे कुठलेही कागदपत्र उपलब्ध नसल्याने सदर दुचाकी चोरीच्या आहेत का, याबाबत चौकशी होणार आहे.
दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या
n राहुरी पोलीस स्टेशन हद्द व दुचाकी चोऱयांची वाढती संख्या हा गेल्या अनेक वर्षांपासून चिंतेचा विषय ठरला आहे. दुचाकी चोरीनंतर मध्यस्थामार्फत मांडवली करून मूळ मालकाला वाहने परत देण्याच्या गंभीर घटना राहुरी हद्दीत अनेकदा घडल्या आहेत. 2023 मध्ये राहुरी हद्दीत दुचाकीचोरीचे 112 गुन्हे दाखल होते. त्यापैकी अवघे 12 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. नगर-मनमाड महामार्ग तसेच शहरातील बाजारपेठेतून विना क्रमांकाच्या दुचाकीवर धूम स्टाईल निघून जाणाऱया टवाळखोरांची संख्या जास्त प्रमाणात वाढली आहे. विना क्रमांकाच्या वाहनाकडून अपघात घडून वाहन घटनास्थळावरून निघून गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, या पार्श्वभूमीवर राहुरी पोलिसांनी दुचाकीचालकांवर कारवाईचा बडगा उगारला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List