महाराजांच्या महाराष्ट्राचा व शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्याला गुडघे टेकायला लावणार, उद्धव ठाकरे यांचा घणाघात
”छत्रपती शिवाजी महाराज म्हणायेच की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देढाला देखील हात लावायचा नाही. इथे हे नाशिकमध्ये आल्यावर कांदा शेतकऱ्यांना अडवलं जातंय. शेतकऱ्यांना अडकवून ठेवणारे यांचे नतद्रष्ट सरकार कुठे आणि छत्रपती शिवाजी महाराज कुठे. आज यांना आपण मुंबईत रस्त्यावर आणलं आहे. लवकरच महाराजांच्या महाराष्ट्राचा व व शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्याला गुडघे टेकायला लावणार; असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. नाशिकमधील हुतात्मा कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ जाहीर विराट सभा पार पडली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकार व मिंधे सरकारची सालटी काढली.
”आज आपले मोदीजी सुद्धा नाशिकमध्ये होते. त्यांना एवढा ताण पडलाय मनावर. कुणीतरी सांगितलं की ते झोपंतच नाही. झोप अपुरी झाली की मेंदूवर परिणाम होतो. लोकं भ्रमिष्ठासारखे बोलायला लागतात. हिंदुहृदयसम्राटांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावर सोपवली. तरीही काही पावटे शिवसेनेला नकली म्हणतात. यांना कुठे मूळ फुटले काय माहिती. तेलंगणाच्या सभेत हे मला नकली संतान म्हणाले. मोदीजी तुम्ही माझा पक्ष फोडला, माझं धनुष्यबाण चोराच्या हातात दिला आहे पण आता सर्वत्र मशाल जोरदार पेटली आहे. हे लक्षात ठेवा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.
”भाजपकडे सर्व फोर्स आहे तरीसुद्धा ते उद्धव ठाकरेला घाबरतात. शिवेसनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट व माँसाहेबांच्या आशिर्वादाने माझ्याबाजूला एक कवच तयार केलं आहे. नकली संतानं तर यांना मांडीवर घ्यावी लागत आहे. आणि एक नकली संतान मांडीवर घेतलं ते तर अक्षरश: वाह्यात निघालं. प्रफुल पटेल. काल महाराजांचा जिरेटोप यांनी मोदींच्या डोक्यावर घातला. आज शेतकऱ्यांची गांधी टोपी मोदींनी घातली. रोज टोप्या बदलणारा पंतप्रधान चालेल का तुम्हाला. वाटेल त्यांच्या डोक्यात महाराजांचा जिरेटोप घालू नका. तुम्ही प्रफुल पटेल असाल तरी महाराष्ट्र तुम्हाला आपटेल. कुणाच्या डोक्यावर ठेवता जिरेटोप ठेवता. मोदींची पात्रता आहे का महाराजांची बरोबरी करायची. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना आम्ही दैवत मानतो त्यांचं राज्य कसं चालत होतं. त्यांच्या राज्यात महिलेवर अत्याचार केला तर जिथल्या तिथे त्यांचे हातपाय तोडायचे. आणि मोदीजी तुम्ही काय करताय? मणिपूरमध्ये महिलांची धिंड निघाली. तिकडे जायची हिंमत नाही. ना मोदींची ना शहांची. अशा मोदींची महाराजांच्या जिरेटोपाला हात लावायचा काय दर्शन घ्यायची पात्रता नाहीस असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
”कांदा उत्पादकांवर निर्यांतबंदी आहे. बंदी काढली तर कर लावतात. स्वत:च्या गुजरातमध्ये निर्यातबंदी उठवता. का हा असा भेदभाव करताय. हा महाराष्ट्र पुरेसा आहे तुम्हाला गुजरातमध्ये पाठवून द्यायला. गद्दारांना पन्नास खोके देता आणि माझ्या शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव देत नाही. मी शेतकऱ्यांना वचन देतोय की इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर तुमच्या हिताचा निर्णय घेऊ. यांच्या सरकारने शेतमालावर लावलेला जीएसटी आपलं इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर जीएसटी काढून टाकणार. आपल्या महाराष्ट्राचं वैभव मी परत आणल्याशिवाय राहणार नाही. साधी महानंदा डेअरी यांनी गुजरातच्या घशात घातली. सगळं महाराष्ट्राचं देऊन टाक गुजरातला असे यांचे धोरण आहे. डेअरी दिली तर दिली वरून अडीचशे कोटी दिले”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List