सांगलीतील 17 तलाव पडले कोरडे; 15 तलावांत मृतसाठा फक्त 14 टक्के उपयुक्त पाणीसाठी शिल्लक

सांगलीतील 17 तलाव पडले कोरडे; 15 तलावांत मृतसाठा फक्त 14 टक्के उपयुक्त पाणीसाठी शिल्लक

>>प्रकाश कांबळे

सांगली जिह्यात मध्यम पाच व लघु 78 असे 83 प्रकल्प आहेत. त्यापैकी 17 तलाव कोरडेठाक पडले आहेत. तर, 15 तलावांनी मृतसाठा गाठला आहे. जिह्यात उपयुक्त असणारा पाणीसाठा अवघा 14 टक्के इतका आहे. या काळात मागील वर्षी हा साठा 33 टक्के होता. मागील वर्षाच्या तुलनेत हा साठा 50 टक्क्याने घटला आहे. दिवसेंदिवस पाणीसाठय़ात घट होत आहे. मे अखेरीस हा साठा कमालीचा घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिह्यात पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली असल्याचे चित्र आहे.

मागील वर्षी मान्सूनने दडी मारल्याने आणि परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने टंचाईचा सामना करावा लागत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून पाण्याची पातळी कमी झाली. नद्या, तलाव, विहिरी, पाझर तलाव, धरणातील पाणी पातळी झपाटय़ाने कमी होऊ लागली आहे. वाढत्या उन्हामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची मागणी वाढली आहे. मात्र, सर्वत्रच भूजल पातळी कमी झाल्याने टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिह्यातील लघु आणि मध्यम तलावातील पाणीही उच्चांकी कमी झाल्याने मे महिन्यात पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

सांगली जिह्यात 83 प्रकल्प असून, त्यांची पाणीसाठवण क्षमता 9 हजार 440 दशलक्ष घनफूट असून, त्यापैकी 1587 दशलक्ष घनफूट हा मृत पाणीसाठा आहे. प्रकल्पातील एकूण पाणी साठय़ापैकी 7853 दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर करता येतो. गतवर्षी कमी पाऊस झाला. त्यामुळे हे प्रकल्प शंभर टक्के भरले नाहीत. त्यामुळे जिह्यात डिसेंबर महिन्यापासून पाणीटंचाई जाणवू लागली. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यात पाणी टंचाई तीव्र झाली. त्यामुळे या प्रकल्पातील पिण्याच्या पाण्यासह शेतीला पाणी वापरण्यात येऊ लागले.

तासगावमध्ये 5 टक्के, जत तालुक्यात 6 टक्के आणि मिरज तालुक्यात 8 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या तीनही तालुक्यांतील प्रकल्पांत सर्वांत कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे तासगाव, जत आणि मिरज या तीन तालुक्यांत पाण्याची गंभीर स्थिती उद्भवली आहे. गतवर्षी याच वेळी 33 टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. मार्च महिन्याच्या तिसऱया आठवडय़ात प्रकल्पात 21 टक्के पणीसाठा शिल्लक होता. एका महिन्यात 4 टक्क्यांनी उपयुक्त पाणीसाठय़ात घट झाली आहे.

गतवर्षी एप्रिल महिन्याच्या तिसऱया आठवडय़ात 2586 दशलक्ष घनफूट म्हणजे 33 टक्के इतके पाणी शिल्लक होते. यावर्षीच्या एप्रिल महिन्यात 1383 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या एप्रिलमध्ये 1 हजार 185 दशलक्ष घनफूट म्हणजे पन्नास टक्क्यांनी पाणीसाठा घटला आहे. त्यामुळे मे महिन्यात पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे.

कडेगाव तालुक्यात सर्वाधिक पाणीसाठा

सांगली जिह्यातील कडेगाव तालुक्यात 7 प्रकल्प आहेत. गतवर्षी या प्रकल्पात 56 टक्के पाणीसाठा होता. तर यावेळी 44 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे कडेगाव तालुक्यात पाणीटंचाई नाही.

जत तालुक्यात अवघा

6 टक्के पाणीसाठा

जत तालुक्यात तालुक्यात 27 प्रकल्प असून, त्याची साठवण क्षमता 3 हजार 628 दशलक्ष घनफूट इतकी आहे. 2987 दशलक्ष फूट इतका पाणीसाठा उपयुक्त आहे. गतवर्षी एप्रिलच्या तिसऱया आठवडय़ात प्रकल्पात 30 टक्के इतका पाणीसाठा होता. यावर्षी एप्रिलच्या तिसऱया आठवडय़ात अवघा सहा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर 12 तलाव कोरडे पडले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;