बारा तासांत दोन सशस्त्र हल्ले; इचलकरंजी शहरात घबराट
शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारा तासांत सशस्त्र हल्ल्याच्या दोन घटना घडल्यामुळे पोलीस खात्याची धावपळ उडाली. एका हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसऱया घटनेत एकजण गंभीर जखमी झाला. या घटनांमुळे खळबळ उडाली आहे. यातील हल्ल्याची एक घटना रविवारी रात्री, तर दुसरी घटना सोमवारी सकाळी घडली.
पंचगंगा साखर कारखान्याजवळ अष्टविनायकनगर येथील गाडीअड्डा मैदानात रविवारी रात्री अकराच्या दरम्यान एक जखमी तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिसांनी धाव घेत जखमी तरुणाला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. राकेश धर्मा कांबळे (वय 32, रा. गणेशनगर गल्ली, इचलकरंजी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
घटनास्थळी दोन मोडतोड झालेल्या दुचाकी आढळल्या. रविवारी रात्री उशिरापर्यंत तेथे मिरवणुका निघाल्या होत्या. त्याचा फायदा घेऊन कांबळे याच्यावर 12 ते 15 जणांनी सशस्त्र्ा हल्ला केला. गंभीर जखमी झाल्याने राकेश कांबळे मयत झाला. याप्रकरणी त्याचा भाऊ राहुल कांबळे याने पोलिसांत फिर्याद दिली आहे, तर पोलिसांनी या प्रकरणी सूरज आनंदा कौंदाडे (वय 27), ओंकार दत्तात्रय खोत (वय 26), ऋषिकेश श्रीकांत साळुंखे (वय 25), प्रतीक दीपक खोत (वय 35), संदेश ऊर्फ स्वप्नील बाजीराव जाधव (वय 23) व राकेश रामा कोरवी (वय 26) यांच्यासह अन्य सहा ते आठ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
हल्ल्याची दुसरी घटना सोमवारी (दि. 13) सकाळी जिजामाता मार्केट येथील मुलतान मल बाबूलाल ऍण्ड कंपनी येथे घडली. कंपनीत दिवाणचे काम करणारे सूरज अशोककुमार राठी (वय 32) या युवकावर जुन्या वादातून कोयत्याने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी प्रणव मानकर आणि समर्थ जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या हल्ल्यात सूरज राठी गंभीर जखमी झाले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List