पंजाब-हरयाणातील गावांमध्ये भाजप नेत्यांना नो एण्ट्री; शेतकरीविरोधी मोदी सरकारला दणका
शेतमालाला किमान हमीभाव आणि विविध मागण्यांसाठी हरयाणा आणि पंजाबच्या शंभू बॉर्डरवर फेब्रुवारीपासून ठाण मांडून बसलेल्या शेतकऱयांनी मोदी सरकारला मोठा दणका दिला आहे. पंजाब-हरयाणातील गावांमध्ये भाजप नेत्यांना शेतकऱयांनी बंदी घातली आहे. गावांच्या वेशीवरच भाजप नेत्यांना अडवून धरण्यासाठी शेतकरी मोठय़ा संख्येने ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारची चांगलीच गोची झाल्याचे चित्र आहे.
पंजाब आणि हरयाणातील अनेक गावांमध्ये भाजप उमेदवारांच्या गाडय़ा रोखल्या जात आहेत. येथे 1 जून रोजी निवडणूक होणार आहे. त्यामुळे जोरदार निवडणूक प्रचार सुरू आहे. प्रचार ऐन रंगात आलेला असताना आता मोदी सरकारला शेतकऱयांच्या संतापाचा, आक्रोशाचा सामना करावा लागत आहे. याबाबत भाजपा नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे भाजपा आणि शेतकऱयांमधील हा संघर्ष निवडणूक आयोगाच्या दारापर्यंत पोहोचला आहे, तर दुसरीकडे शेतकरी नेते बलबीर सिंह राजेवाल यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱयांच्या शिष्टमंडळाने नेते आणि सुरक्षा दलांकडून मनमानीपणे गावांमध्ये घुसखोरी केल्याची तक्रार निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांकडे करण्यात आली आहे.
या भाजप उमेदवारांना फटका
गेल्याच आठवडय़ात शेतकऱयांनी भाजपाचे सोनीपतचे उमेदवार मोहनलाल बडोली यांची प्रचार रॅली थांबवली. यात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. याशिवाय सिरसातून निवडणूक रिंगणात असलेले अशोक तंवर, हिसारचे उमेदवार रणजीत चौटाला, रोहतकचे उमेदवार अरविंद शर्मा आणि करनालमधून निवडणूक रिंगणात असलेले माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना शेतकऱयांच्या रोषाचा सामना करावा लागला.
निवडणूक आयोगाची शेतकऱयांना विनवणी
मोदी सरकारच्या हातचे बाहुले असलेल्या निवडणूक आयोगानेही शेतकऱयांच्या संतापाचा चांगलाच धसका घेतल्याचे चित्र आहे. शेतकऱयांच्या विरोधाप्रकरणी भाजपा नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कठोर भूमिका न घेता निवडणूक आयोगाने शेतकऱयांना भाजपा नेत्यांना न अडवण्याची विनंती केली आहे. उमेदवारांना प्रचाराचा अधिकार असून त्यांच्या कार्यात बाधा आणू नये अशी विनवणी केल्याचे समजते. अशा प्रकारच्या कारवाया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन असल्याचे सांगण्यात आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List