उत्तर मुंबईत महाविकास आघाडीचा प्रचाराचा धडाका
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भूषण पाटील यांच्या प्रचार रॅलींना प्रचंड प्रतिसाद मिळत असून जागोजागी नागरिकांकडून त्यांचे जंगी स्वागत होत आहे. पाटील यांनी आज गोराई मनोरी गाव येथील संपूर्ण परिसरात प्रचार फेरी केली. गोराई गाव, अप्पर कोळीवाडा, लोअर कोळीवाडा, हॉली मेगी चर्च, आदिवासी पाडा, जुही पाडा, शेफाली गाव, मनोरी गाव या भागात प्रचार फेरी केली. यावेळी तेथील सर्व स्थानिक कोळी आणि आगरी समाज व ख्रिश्चन समाज यांनी भूषण पाटील यांचे जंगी स्वागत केले तसेच उत्स्फूर्तपणे प्रचार फेरीमध्ये सहभागी झाले.
भूषण पाटील यांनी तेथील चर्च आणि मंदिरांना भेटी दिल्या. काही ठिकाणी आरतीसुद्धा केली. स्थानिकांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या. या परिसरात चांगले रस्ते, वीज आणि पाण्याची मोठी समस्या आहे. त्यांना टँकरने पाणी उपलब्ध करावे लागते. अनेक तास वीज नसते. गावात आणि पाडय़ात चांगले रस्ते नाहीत. हा परिसर मुंबईचाच एक भाग असूनसुद्धा त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले आहे. उत्तर मुंबईत गेली दहा वर्षे भाजपचा खासदार असूनसुद्धा येथील समस्या व अडचणी दूर झाल्या नाहीत. याउलट दुर्लक्षच करण्यात आले आहे. भूषण पाटील हे भूमिपुत्र असल्यामुळे त्यांना कोळी आणि आगरी समाजाकडून खूप चांगला प्रतिसाद आणि पाठिंबा मिळत आहे. भूषण पाटील यांनी यावेळी उपस्थितांना या परिसरातील सर्व समस्या, अडचणी सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List