युद्ध संपवण्यासाठी इस्रायलला ‘वाट्टेल ते’ करू देण्याचा अमेरिकन सिनेटरचा सल्ला; अण्वस्त्र हल्ल्याचं समर्थन केल्यानं खळबळ
इस्रायल-हमास युद्धाची दुसऱ्या महायुद्धाशी तुलना करताना रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम म्हणाले की, युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेनं जपानवर अणुबॉम्ब टाकणे हा ‘योग्य निर्णय’ होता आणि युद्ध संपवण्यासाठी इस्रायलला ‘त्यांना आवश्यक’ बॉम्बही दिले पाहिजेत.
रिपब्लिकन सिनेटर आणि इस्रायलचे कट्टर समर्थक ग्रॅहम यांनी इस्रायलला 3000 विध्वंसक बॉम्बच्या वितरणाला विराम दिल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यावर टीका केली.
रविवारी एनबीसी न्यूजवर दिलेल्या मुलाखतीदरम्यान, ग्रॅहम म्हणाले की, ‘जेव्हा पर्ल हार्बर नंतर एक राष्ट्र म्हणून आम्हाला विनाशाचा सामना करावा लागला, जर्मन आणि जपानी लोकांशी लढा दिला तेव्हा आम्ही [हिरोशिमा] आणि नागासाकीवर अण्वस्त्रांसह बॉम्बफेक करून युद्ध संपवण्याचा निर्णय घेतला. हा योग्य निर्णय होता’.
ते पुढे म्हणाले की, ‘इस्रायलला युद्ध संपवण्यासाठी आवश्यक असलेले बॉम्ब द्या. त्यांना पराभूत होणं परवडणार नाही’.
पुढे हिरोशिमा आणि नागासाकी मधील बॉम्बहल्ल्यांशी तुलना करून यूएस सिनेटर म्हणाले की इस्रायलने ‘ज्यू राष्ट्र’ म्हणून टिकून राहण्यासाठी ‘काहीही’ केले पाहिजे.
ते पुढे म्हणाले, ‘अमेरिकेनं आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी हिरोशिमा – नागासाकीवर बॉम्ब टाकले ते योग्यच होते. आता इस्रायलनं ज्यू राष्ट्र म्हणून टिकून राहण्यासाठी जे काही करावे लागेल ते केलं पाहिजे’.
रिपब्लिकन सिनेटरनं असाही युक्तिवाद केला की संपूर्ण संघर्षात नागरिकांच्या हत्येसाठी हमास जबाबदार आहे कारण तो गाझापट्टीतील नागरिकांना ‘मानवी ढाल’ म्हणून वापरतो.
‘मला वाटते की जोपर्यंत हमास त्यांच्या स्वत:च्या लोकांना मानवी ढाल म्हणून वापर करत आहे तोपर्यंत गाझामधील नागरी मृत्यू कमी करणे अशक्य आहे. मी युद्धाच्या इतिहासात कधीही पाहिले नाही की स्वत:च्या रक्षणासाठी नागरिकांचे जीव धोक्यात आणले जातात.
अलीकडेच राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलला 3000 विध्वंसक बॉम्बच्या वितरणाला विराम दिला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List